बोटींबरोबर आम्हालाही कापा
By admin | Published: November 7, 2016 06:36 AM2016-11-07T06:36:29+5:302016-11-07T06:36:29+5:30
तालुक्यातील खानिवडे व कोपर बंदरात रेती उत्खनन बंद असतानाही सक्शन पंप व बोटींवर महसूल विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रेती व्यावसायिकांनी मुंबई-कर्णावती
वसई/पारोळ : तालुक्यातील खानिवडे व कोपर बंदरात रेती उत्खनन बंद असतानाही सक्शन पंप व बोटींवर महसूल विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रेती व्यावसायिकांनी मुंबई-कर्णावती महामार्ग रविवारी सुमारे दोन ते अडीच तास रोखून धरला. आमच्या बोटींबरोबर आम्हालाही कापा, असा आग्रह हे आंदोलक करीत होते.
महसूल विभागाकडून बोटी व सक्शन पंप बंद असतानाही केवळ ते नदी पात्रात आहेत म्हणून कारवाई करून तोडण्यात आले. असे न करता जे सक्शन पंप व बोटी रेती उत्खनन करताना आढळतील त्यांच्यावरच कारवाई करावी. पंप आणि बोटी नदीत अथवा खाडीत ठेवायच्या नाहीत, अशी प्रशासनाची भूमिका असेल तर आम्हाला त्या सुरक्षित जागी हलविण्यास वेळ द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी या वेळी केली. या आंदोलनाचे नेतृत्व विभागातील माजी खासदार बळीराम जाधव यांनी केले. या वेळी जि.प. सदस्या कल्याणी तरे, नगरसेविका रमा किणी, टीडीसी बँक संचालक राजेश पाटील यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने भूमिपुत्र यात सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.
खानिवडे बंदरात बोटी व सक्शन पंप तोडण्यास सकाळी सुरुवात झाली. या बंदरात महिनाभरापासून रेती उत्खनन बंद आहे, त्यामुळे ही कारवाई योग्य नसल्याचा दावा करून कोपर, खानिवडे, खराट, तारा व आसपासच्या गावांतील भूमिपुत्रांनी एकत्र येऊन महामार्ग रोखला होता. आंदोलकांच्या मागणीचा विचार करून वरिष्ठ पातळीवरील चर्चेप्रमाणे कारवाई तात्पुरती स्थगित केल्याचे वसई प्रांत क्षीरसागर यांनी जाहीर केल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला. (प्रतिनिधी)