तुमची लढाई आम्ही लढू

By admin | Published: May 1, 2015 02:44 AM2015-05-01T02:44:43+5:302015-05-01T02:44:43+5:30

शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.

We fight against you | तुमची लढाई आम्ही लढू

तुमची लढाई आम्ही लढू

Next

खचू नका : संवाद पदयात्रेतून राहुल गांधींचे शेतकऱ्यांना आवाहन
गणेश देशमुख - टोंगलाबाद (जि. अमरावती)
विदर्भात यापूर्वीही आलोय; पण शेतकऱ्यांची बिकट स्थिती पहिल्यांदाच बघतोय. शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.
संवाद पदयात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धामणगाव तालुक्यातील गुंजी, शहापूर, हिरापूर आणि रामगाव या गावांचे राहुल यांनी १२ कि.मी.चे अंतर पायी पार केले. त्यानंतर चांदूर तालुक्यातील राजना आणि टोंगलाबाद या गावांत ते कारने दाखल झाले. राहुल यांच्या या ‘संवाद पदयात्रेला’ रणरणत्या उन्हातही प्रचंड प्रतिसाद लाभला. उत्स्फूर्त स्वागत आणि ग्रामस्थांची गर्दी हे चित्र गावागावांत दिसून येत होते.
शेतकरी दु:खाच्या गर्तेत लोटला गेला असताना शासन मदतीला येत नसल्याची भावना शेतकरी कुटुंबीयांनी व्यक्त केली. शेतकरी दु:खात असेल त्यावेळी त्याला मदतीचा हात देणे, उभारी देणे हे शासनाचे कर्तव्यच ठरते. तथापि, केंद्र आणि राज्य शासनाने अशा कठीण समयी वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर, शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ न करणे आणि पूर्वी मिळणारी बोनसची सुविधा स्थगित करणे या देशभरातील शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख समस्या असल्याचे राहुल म्हणाले. एकूणच हे शासन शेतकरी, मजूर आणि गोरगरीबांचे नसून भांडवलदारांचेच असल्याची भावना सामान्यांमध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेस अ़ भा़ काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार माणिकराव ठाकरे आदी
उपस्थित होते.

म्हणून मी आलो

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना काँग्रेसतर्फे मदत
शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन कुठल्या क्षमतेत देऊ? असे सांगत सर्वच पीडित शेतकऱ्यांना मदत करण्याची क्षमता नसली तरी शक्य ती मदत काँग्रेस पक्षातर्फे केली जाईल, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली.

विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आज मी किंवा माझा पक्ष सत्तेत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन तरी कसे देऊ. पण एक सांगतो, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते सर्व माझा पक्ष करेल.
- राहुल गांधी,
उपाध्यक्ष, काँग्रेस.

महापुरुषांना अभिवादन
धामणगाव तालुक्याच्या गुंजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला,
हिरापूर येथे गजानन महाराजांच्या व बजरंगबलीच्या मंदिरात
आणि शहापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
करून राहुल गांधी यांनी अभिवादन केले.

शेतकरी संवाद
हिरापूरच्या बजरंगबली देवस्थानात राहुल गांधींनी शेतकऱ्यांशी सतरंजीवर बसून संवाद साधला. शेतकऱ्यांनी शेतमालाचा भाव, पीक विम्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन, शेतीला पाणी आदी मुद्दे जोरकसपणे मांडले. त्यांच्या या मागण्यांकडे संवेदनशीलपणे लक्ष देण्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.

 

Web Title: We fight against you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.