साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 05:44 AM2020-01-20T05:44:28+5:302020-01-20T05:45:04+5:30

श्री साईबाबा यांच्या जन्मस्थानावरून वाद निर्माण झाला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याचे जवळपास २९ पुरावे सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहेत.

We have 29 proofs of the birthplace of Sai Baba, claim of Patharikar's | साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा

साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा

Next

- विठ्ठल भिसे/ मोहन बोराडे
पाथरी/सेलू (परभणी)- श्री साईबाबा यांचा पाथरी येथील भुसारी कुटुंबात जन्म झाल्यानंतर त्यांचे अध्यात्मिक शिक्षण त्यांचे गुरु गोपाळराव देशमुख ऊर्फ केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या सेलूजवळील उंबरखेड येथील मालकीच्या किल्ल्यात झाला, असा स्पष्ट उल्लेख दासगणू महाराज यांनी १९३६ मध्ये केलेल्या अनुभव कथनात नमूद असल्याचा दावा पाथरीकरांनी केला आहे.

श्री साईबाबा यांच्या जन्मस्थानावरून वाद निर्माण झाला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याचे जवळपास २९ पुरावे सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहेत. श्री साईबाबा यांच्या सहवासात आलेले नांदेड येथील श्री संत दासगणू महाराज ऊर्फ गणपत दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी १९३६ मध्ये आपले अनुभव कथन केले. सेलू येथील श्री साईभक्त घनश्याम सांगतानी यांनी त्यांच्या ‘विभूती’ या पुस्तकात तशी माहिती नोंदविली आहे. त्या माहितीनुसार श्री साईबाबा हे त्यांचे गुरु गोपाळराव देशमुख ऊर्फ केशवराज बाबासाहेब महाराज ऊर्फ व्यंकूजी यांना सेलू येथे भेटले व त्यानंतर त्यांनी केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या सेलूपासून ३० कि.मी.अंतरावर असलेल्या व सध्या जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील उंबरखेड येथील मालकी हक्काच्या किल्ल्यात अध्यात्मिक शिक्षण घेतले. प्रवेशद्वारावर श्री व्यंकटेश प्रसन्न असे लिहिले आहे. किल्ल्यातील तोफेवरही साईबाबा उल्लेख करीत असलेला ‘व्यंकूजी’ हा शब्द कोरलेला आहे.

‘१९०३ मध्ये ‘श्री संत अमृत’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. साईबाबांनी या प्रयत्नास आशीर्वाद दिले. या ग्रंथातील काही भाग त्यांना वाचून दाखविण्यात आला किंवा नाही, या संबंधी माहिती देण्यासाठी बाबांना विचारले त्यावेळी त्यांनी जे काही सांगितले, ते मी टिपून ठेवले. सेलूविषयी त्यांनी जे काही सांगितले, त्याविषयी सेलू गावी जावून मी चौकशी केली. प्रत्येक भाग बाबांच्या हाती देताच, ठीक आहे, असे ते म्हणाले. बाबांना लिहिता वाचता किंवा सही करता येत होती की नाही, हे माहीत नाही’, असे दासगणू महाराज यांच्या अनुभव कथनात नमूद करण्यात आले आहे.

भुसारी कुटुंबात जन्म
साईबाबांचा जन्म पाथरी येथील भुसारी कुटुंबात झाला. याबाबत येथील श्री साईबाबा संस्थानकडे त्यांची वंशावळ उपलब्ध आहे. त्या आधारे परशुराम भुसारी हे साईबाबांचे वडील होते. त्यांना पाच मुले होती. त्यात सर्वात मोठा मुलगा रघुपती, त्यानंतर दादा, त्यानंतर हरिभाऊ अर्थातच श्री साईबाबा, त्यानंतर अंबादास व सर्वात लहान बलवंत अशी पाच मुले होती. पाच भावंडांमधील ज्येष्ठ रघुपती यांना महारुद्र व परशुराम अशी दोन मुले होती. महारुद्र यांचा मुलगा रघुनाथ आणि रघुनाथ यांना दिवाकर आणि शशिकांत ही दोन मुले व एक मुलगी होती. दिवाकर हे हैदराबादला तर शशिकांत हे निजामाबादला स्थायिक झाले. मुलगी नागपूर येथे स्थायिक झाल्याचे त्यांचे वंशज तथा सध्याचे पाथरी येथील श्री साई संस्थानचे विश्वस्त संजय भुसारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रगटभूमीचाही विकास करा

बिडकीन (औरंगाबाद) : येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र धूपखेडा हे गाव साईबाबा यांची खरी प्रगटभूमी असल्याचा दावा येथील श्री साईबाबा मंदिर साई विश्वस्त मंडळाने केला आहे. ही ऐतिहासिक भूमी विकासापासून दूर असून शासनासह प्रशासनाने दखल घेऊन विकास करावा, अशी मागणी श्री साईबाबा मंदिर साई विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग तात्या वाघचौरे व मंडळाने केली आहे. धूपखेडाच्या विकासाबाबत रोहयो व फलोत्पादनमंत्री संदीपान पाटील
भुमरे यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे.

राज्याबाहेरील साईभक्तांची पाथरीत वाढली वर्दळ

पाथरी (जि. परभणी) : आठ दिवसांपासून देशभरातील मीडियामध्ये पाथरी शहराची चर्चा असून रविवारी सकाळपासूनच राज्यासह राज्याबाहेरील भाविकांची पाथरीत दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. पाथरी येथील साई भक्त तसेच स्थानिक नागरिकांनी रविवारी सकाळी ६ वाजेपासून साईमंदिरामध्ये भजनाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. आंध्र प्रदेशातून अनेक भाविक पाथरीत दाखल झाले आहेत. श्री साई संस्थान समितीच्या वतीने मंगळावरी दुपारी १२ वाजता साई मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण नाही
साई जन्मभूमीच्या वादावर शिर्डी येथील साईभक्त आणि कृती समितीची बैठक सोमवारी होणार असली, तरी पाथरी येथील कृती समितीला अद्याप बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आली.

परभणीत साई जागर आंदोलन
परभणी : साई जन्मभूमीसाठी परभणी येथील श्री साई भक्त
सेवा मंडळाच्या वतीने रविवारी परभणी
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साई जागर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात
खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ सुरेश वरपूडकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर आदींसह श्री साई भक्त मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जन्मस्थळ
दानपेटीला धक्का बसताच
पुजाऱ्यांना आली जाग
माहेरचं नाव काढताच
सासरला आला राग
जगात अनेक देशांना
मंदीचा फास आहे
गॉडइंडस्ट्री मात्र तेजीत
पुजाºयाघरी आरास आहे.
- रामदास फुटाणे

Web Title: We have 29 proofs of the birthplace of Sai Baba, claim of Patharikar's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.