शंभर वर्षे शिकत आलो, कुणाला शिकवायला कधी गेलो नाही; बाबासाहेब पुरंदरे यांचे मनोगत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 08:40 AM2021-07-29T08:40:45+5:302021-07-29T08:41:51+5:30
आयुष्यात मिळालेले आई-वडिल आणि शिक्षकांचे संस्कार कधीही विसरणार नाही
पुणे : ‘शंभरावं वर्ष लागतंय... कदाचित विधात्याची ही इच्छा असावी. या काळात मी खूप शिकलो. शिकविण्याचा आव मी कधी आणला नाही...’, शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते.
शंभरावं वर्ष लागतंय. पण मी खरंतर वेगळं असं काही केलं नाही. मला कसलंही व्यसन नाही इतकंच. आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही. अजून दोन ते तीन वर्षे मिळाली तर इतकंच मागतो की मला आजारी पडू देऊ नकोस. पुढील आयुष्य मिळालं तर छान हसत-खेळत स्वावलंबी असावं.... अशी भावना बाबासाहेब यांनी व्यक्त केली.
कोथरूड येथे मुलाच्या घरी बाबासाहेब वास्तव्यास आहेत. वयाची ८० वर्षे शिवचरित्राचा ध्यास घेत तब्बल ५ लाख किलोमीटरचा प्रवास, राजाशिवछत्रपती ग्रंथाच्या १७ आवृत्या, जगभरात २५ हजार व्याख्याने असा थक्क करणारा प्रवास करीत हे शिवशाहीर गुरूवारी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी संवाद साधला. स्पाँडिलायसिसचा त्रास जाणवू लागल्यामुळे ते पडूनच होते. कुणालाही निराश न करता प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करीत उत्साहाने सर्वांना सामोरे जाणारे बाबासाहेब बोलताना काहीसे हळवे झाले. मला अधिक बोलता येत नाहीये त्याबद्दल माफ करा... हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. १९४० साली सायकलवरून पडल्यानंतर त्यांना स्पाँडिलायसिसचा त्रास सुरू झाला.
आयुष्यात मिळालेले आई-वडिल आणि शिक्षकांचे संस्कार कधीही विसरणार नाही. वडिलांचं नेहमी सांगणं होतं की, ‘माणसानं नेहमी समजून वागावं’. ती समजूत आपलीच आपल्याला घ्यायची आहे. ती कुणी आयती आणून देणार नाही. जे शिकवतात ते गुरू. ते जे शिकवतात ते मनापासून शिकलं पाहिजे. आईवडिलांबद्दल आदरभावना ठेवली पाहिजे. जे आपल्यासाठी इतकं करतात त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो. आईवडिलांशी फक्त गोड बोला ते तुम्हाला उदंड आशीर्वाद देतील. कोणाचाही अपमान, द्वेष करू नका असं वडिलांनी शिकवलं. त्यांनी दिलेली शिकवण कधीही विसरलो नाही... बाबासाहेब सांगत होते. शिवशाहरी शंभरीत पदार्पण करीत असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे. पण समाधानी आणि तृप्त नाही. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहायची इच्छा आहे. सर्वांना रायगडावर घेऊन जायचे आहे.’’ - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.