"मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे कोणतेही प्रश्न सुटत नाही म्हणूनच राज्यपालांकडे जावे लागते.."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:29 PM2020-10-31T16:29:14+5:302020-10-31T16:40:04+5:30

जनतेच्या मनात मुख्यमंत्री हे कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढू शकत नाही अशी भावना निर्माण झाली आहे : चंद्रकांत पाटील

We have to go to the Governor because no expectation of the people is being fulfilled by the Chief Minister: Chandrakant Patil | "मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे कोणतेही प्रश्न सुटत नाही म्हणूनच राज्यपालांकडे जावे लागते.."

"मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे कोणतेही प्रश्न सुटत नाही म्हणूनच राज्यपालांकडे जावे लागते.."

Next

पुणे : राज्यात लोकनियुक्त सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे राज्यातील कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. मात्र राज्याचे प्रश्न घेऊन सातत्याने राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विरोधकांना खडे बोल सुनावले होते. त्याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे हे फक्त नावालाच मुख्यमंत्री आहे.शरद पवारच महाराष्ट्र चालवतात. यावर संजय राऊत यांनीच आता शिक्कामोर्तब केले आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील वाढीव वीज बिल, मराठा आरक्षण, ओबीसी समाज, धनगर समाज आरक्षण, अतिवृष्टीच्या नुकसान यांसह कोणत्याच प्रश्नावर मार्ग काढला जात नाही. त्यामुळे जनतेच्या मनात मुख्यमंत्री हे कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढू शकत नाही अशी भावना निर्माण झाली आहे. याचमुळे जो तो आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यामागे निदान राज्यपाल तरी मुख्यमंत्री किंवा संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना सूचना देऊन त्यांचे प्रश्न निकाली काढतील अशी त्या नेते मंडळी व नागरिकांची भावना आहे. 

सातत्याने कुणावर ना कुणावर टीका करत राहणे हे संजय राऊत यांच्या नोकरीचा भाग आहे. एखाद्यादिवशी त्यांनी जर भाजपवर टीका केली नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्यावर अग्रलेख लिहिला नाही तर त्यांना जाब विचारला जाऊ शकतो. म्हणून टीका टिपण्णी करण्याचे काम करतात. ते त्यांनी जरूर करावे. आणि सत्तेत आल्यापासून तर महाविकास आघाडी सरकारने घटना बंदच करून ठेवली आहे. वाट्टेल ते शब्दात सरकारमधील सहभागी नेते मंडळी वाट्टेल या शब्दात टीका करत सुटले आहे.त्यांनी कुणावरही टीका केली तरी चालते मात्र कुणी त्यांच्यावर टीका केली तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलतात. हे योग्य नाही, अशा शब्दात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे धोरण हे दुटप्पीपणाचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले.  

घोडे मैदान फार लांब नाही.. 
 झेंडा वेगळा, तत्व वेगळी आणि एकत्र लढता तरी पण आम्हाला काही फरक पडत नाही. आमची सर्वप्रकारची तयारी आहे. फक्त हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या तीन पक्षांनी वेगवेगळं लढून दाखवावे. पण तुमच्यात हिंमत नाही. आणि कुणाचा कुणाला ताळमेळ सुद्धा नाही. 
तुम्ही पाच वर्ष सरकार चालवलं तरी भक्कम आणि प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप उडवण्याची आमची तयारी आहे. पण घोडे मैदान फार लांब नाही.. 

Web Title: We have to go to the Governor because no expectation of the people is being fulfilled by the Chief Minister: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.