परखड,व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो - विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 11:38 AM2017-09-25T11:38:42+5:302017-09-25T12:17:06+5:30
ज्येष्ठ साहित्यिक,पत्रकार अरुण साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एक परखड,व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो आहोत.
मुंबई - पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक,पत्रकार अरुण साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एकपरखड,व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
‘सिंहासन’, ‘झिपऱ्या’, ‘मुंबई दिनांक’ अशा एकाहून एक सरस कलाकृतींनी मराठी साहित्यविश्वात पत्रकार अरुण साधू यांनी स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले होते. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि चतुरस्त्र प्रतिभेच्या अरुण साधू यांनी मराठी कादंबरी, कथासंग्रह,एकांकिका, नाटक आणि ललित लेखन या विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून विपूल लेखन केले.
त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या विविधांगी स्वरुपाच्या लिखाणाने साधू यांनीपत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला होता. गेली ४० वर्ष सातत्याने समकालाचा वेध घेणारं लेखन अरुण साधू यांनी केले होते, त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे असेही श्री.विनोद तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.