आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर केला नाही - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 08:41 PM2019-11-07T20:41:29+5:302019-11-07T20:42:29+5:30
भाजपाने राजकारणामध्ये टीकाटिप्पणी केली. पण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा कधीही अनादर केला नाही.
पंढरपूर - भाजपाने राजकारणामध्ये टीकाटिप्पणी केली. पण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा कधीही अनादर केला नाही. परंतु नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले जात असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केले.
पंढरपूर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजा निमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे पंढरपूर येथे आले आहेत. त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपा आमदार फोडत नाही. ती भाजपाची संस्कृती नाही. २०१४ मध्ये भाजपाने केलेला विकास व भाजपच्या कार्यपद्धतीमुळे आकर्षित होऊन इतर जणांनी भाजपात प्रवेश केला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
उद्या शपथविधीबाबत महसूलमंत्री साशंक
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. महायुतीचे सरकार व्हावे, अशी लोकांची इच्छा आहे. परंतु जनादेश देऊनही सरकार स्थापन होत नसल्याचे दुःख असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आम्ही राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती राज्यपालांना सांगितले आहे त्यांच्याशी कायदेशीर चर्चा केली. परंतु यानंतर पत्रकारांनी उद्या शपथविधी होणार का असे विचारल्यास चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगले. त्यामुळे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उद्या होणार्या शपथविधी बाबत साशंक असल्याचे दिसून आले.