गजानन पाटीलशी आमचा काहीही संबंध नाही : महाजन, भोर्इंचा दावा
By admin | Published: June 3, 2016 03:16 AM2016-06-03T03:16:55+5:302016-06-03T03:16:55+5:30
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे ओएसडी (आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी) उन्मेश महाजन आणि खडसे यांचे स्वीय सचिव शांताराम भोई यांचे म्हणणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
डिप्पी वांकाणी, मुंबई
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे ओएसडी (आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी) उन्मेश महाजन आणि खडसे यांचे स्वीय सचिव शांताराम भोई यांचे म्हणणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३० कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात नोंदवून घेतले आहे. या प्रकरणी एसीबीकडे गुन्हा दाखल झालेला आहे.
एसीबीच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार महाजन आणि भोई यांनी
आमचा गजानन पाटील याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे
एसीबीला सांगितले. ३० कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात पाटील हा आरोपी असून त्याला अटक झालेली आहे. पाटील याने खडसे यांचा स्वीय सचिव (पीए) असल्याचे दाखवून त्याचे स्वत:चे मंत्र्याशी व त्यांच्या कर्मचाऱ्यांशी संबंध असल्याचे चित्र निर्माण केले होते.
जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे माजी संचालक रमेश जाधव यांनी गजानन पाटील याने कल्याणमधील निजले खेड्यातील दहा हेक्टर जमीन देण्यासाठी कोणा ‘साहेबा’च्या वतीने ३० कोटी रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार दिल्यानंतर पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सरकारला एसीबीने दिलेल्या आपल्या अहवालात खडसे निर्दोष असल्याचे (क्लीन चिट) म्हटले. खडसे आणि तक्रारदार
यांच्यात कोणताही संपर्क नव्हता, असे अहवालात म्हटले असून आता एसीबीने महाजन आणि भोई
यांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे. ‘‘पाटीलशी आमचा काहीही
संबंध नाही, असे महाजन आणि
भोई यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु रमेश जाधव याच्याशी वेगवेगळ्या प्रसंगी भेट झाल्याचे त्यांनी मान्य केले’’, असे एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या भेटींचा उद्देश काय व ते दोघे व तक्रारदार यांच्यात चर्चा काय
झाली, असे विचारता हा अधिकारी म्हणाला की, ‘‘जाधव २००९ पासून अनेक वेळा त्यांना जमीन देण्याबाबत भेटला. ती जमीन सरकारची असल्यामुळे ती तुम्हाला देता येत
नाही, असे आम्ही जाधव याला या भेटींमध्ये सांगितले, असे महाजन व भोई यांनी आम्हाला सांगितले. याशिवाय जाधव याला आम्हाला ती जमीन तुला देण्याचे कोणतेही अधिकार नाहीत, असे सांगितल्याचे नोंदवून घेतलेल्या निवेदनात म्हटले आहे.’’
त्या दोघांनी जे सांगितले ते सकृतदर्शनी तुम्हाला पटते का यावर हा अधिकारी म्हणाला की, ‘‘आम्ही अद्याप त्यापैकी कोणालाही ‘क्लीन चिट’ दिलेली नाही. ते जे काही म्हणाले त्याबद्दल आम्हाला काही पुरावे गोळा करता येतात का हे बघू व त्यानुसार आरोपपत्र दाखल करू.’’
>>>>>>>>>>
प्रकरण असे आहे
च्खडसे यांच्या ‘स्वीय सचिवाने’ मला ती जमीन देण्यासाठी पैसे मागितले, असा आरोप जाधवने केला होता. ती जमीन आधी जाधव याला दिली गेली होती, परंतु नंतर ती सरकारने परत घेऊन राज्य परिवहन महामंडळाला दिली, असेही जाधवचे म्हणणे होते.
च्जाधवने पाटीलसोबत गेल्या वर्षी सप्टेंबरपासून झालेली १२ संभाषणे रेकॉर्ड करून ठेवली होती. पाटील न्यायालयीन कोठडीत असून एसीबीने आपल्या अहवालात या प्रकरणात एकनाथ खडसे प्रथमदर्शनी अडकल्याचे आढळले नाहीत, असे म्हटले.