सावित्रीच्या आम्ही लेकी

By Admin | Published: January 2, 2015 11:36 PM2015-01-02T23:36:31+5:302015-01-02T23:36:31+5:30

मुलींसाठी शाळा सुरु करणाऱ्या देशातील पहिल्या शिक्षिका, घरा-घरांत ज्ञानज्योत लावणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती.

We have taken Savitri's | सावित्रीच्या आम्ही लेकी

सावित्रीच्या आम्ही लेकी

googlenewsNext

पुणे : मुलींसाठी शाळा सुरु करणाऱ्या देशातील पहिल्या शिक्षिका, घरा-घरांत ज्ञानज्योत लावणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सावित्रीबार्इंनी घेतलेला स्त्रीशिक्षणाचा वसा आज त्यांच्या लेकी समर्थपणे पुढे नेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर दिसत आहेत. अनेक ठिकाणी ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शिक्षणक्षेत्रात अनोखे काम करणाऱ्या दुर्गम भागात जाऊन अखंड ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षिकांना मानाचा सलाम.

विद्यार्थ्यांत जागवला आत्मविश्वास
कोरेगाव भीमा : सावित्रीबार्इंनी महिला शिक्षणामध्ये क्रांती घडविली. त्यामुळे समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सामाजिक दृष्टीकोनातील आत्मविश्वास वाढविला, तर विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, असे करडे (ता. शिरुर) येथील आदर्श शिक्षिका सुवर्णा कैलास गारगोटे यांनी सांगितले.
मुलांकडून साहित्य निर्मिती करुन घेण्यावरही त्यांनी भर दिला आहे. शालाबाह्य मुलांना शाळेत आणून त्यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका निर्माण करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली, तर मुलांमध्ये शैक्षणिक आवड निर्माण होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या व्यावसायात मदत केली, तर मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावसायिक ज्ञान अधिक मिळू शकते.
परंतु मुलगा शिष्यवृत्तीत लागला तरच त्याची गुणवत्ता वाढत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे. जसे मुले खेळात, योगासनात, वक्तृत्व स्पर्धां बरोबरच त्याच्या शारिरीक व भावनिक विकासामध्ये वाढ निर्माण होणे गरजेचे आहे. गारगोटे बार्इंनी शिष्यवृत्तीसाठी मुलांना अधिक ज्ञान मिळावे म्हणून स्वत: स्पर्धा परीक्षांची पुस्तके मुलांना आणून देत शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठीही प्रयत्न केले आहे.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील शिक्षकांना ‘कृतीयुक्त अध्ययन पध्दती’ या विषयावर मार्गदर्शनही केले होते.
सुवर्णा गारगोटे यांनी ११ वर्षे सहा महिने जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवा करीत आहे. त्यांना २०१२ साली आदर्श पुरस्कारासाठी पंचायत समितीस कोणतीही शिफारस केली नसतानाही केवळ गुणवत्तेच्या आधारावर पंचायत समितीच्या उपसभापती मंगल लंघे यांनी त्यांच्या नावाची शिफारस करीत २०१२ सालचा ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार मिळाला आहे, असे विस्तार अधिकारी मुकूंद देंडगे यांनी सांगितले.

४सुवर्णा गारगोटे यांनी दौंड तालुक्यात काम करीत असताना नानगाव याठिकाणी चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एक, त्यानंतर शिरुर तालुक्यात २००९-१० साली तीन व २०१३-१४ साली एक मुलगा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकावले होते. सन २०१० साली यशवंतराव कला क्रीडा यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आला होता.

सुवर्णा गारगोटे
करडे

क्रांतिज्योतीच्या
जपल्या पाऊलखुणा
लेण्याद्री : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाऊलखुणावरून चालणान्या अनेक शिक्षका आज समाजात आपल्याला दिसून येतात.
जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय, जुन्नर येथे गेली २५ वर्षे नोकरी नव्हे तर सेवा म्हणून काम करणाऱ्या शाळेला शाळा म्हणून नव्हे तर भविष्यातील सुजान नागरीक घडवणारे मंदिर समजणाऱ्या
उर्मिला गोटीराम थोरवे ह्या त्यापैकीच एक. बाईनी शाळेत सेवा सुरू केल्यापासून थोडयाच कालवधी मध्येच त्या विद्यार्थीप्रिय झाल्या त्यानी विद्यार्थ्यावर केलेल्या प्रेमाची ती पावती होती.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जुन्नर नगर परिषदेने त्यांना दोन वेळा आर्दश शिक्षिका म्हणून गौेरवले तसेच जुन्नर एज्युकेशन सोसायटीने सुद्धा त्यांचा आर्दश शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव केला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान आहे . जुन्नर तालुक्यातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या कलोपासक या सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्षपद भूषवत असताना संगित विद्यालय, दिवाळी पहाटगीत, एका पेक्षा एक बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी त्यांनी लोकांना दिली. जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या सेवकवर्ग पतसंस्थेचे सभापती, गणोशोत्सव प्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला ज्ञानरथ पुढे असाच हाकण्याचा मानस यावेळी या सावित्रिच्या लेकीने व्यक्त केला.


४शालेय अभ्यासक्रमाबरोबरच त्या आपल्या विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात सतत पुढे कसा राहिल यासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात.
४याचाच एक भाग म्हणजेच पूर्व माध्यमिक परीक्षेत त्यांच्यां विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश नजरेत भरण्या जोगे आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
४जिल्हापातळीवर घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण वर्गास त्यांनी मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हा त्यांचा हट्टास असतो त्यासाठी पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी कमालीची आहे.
४विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा म्हणून त्यांनी शाळेत विविध उपक्रम राबवले.

उर्मिला थोरवे
जुन्नर

महिला सबलीकरणासाठी प्रयत्न
बारामती : शहरातील श्री छत्रपती शाहू हायस्कूलच्या शिक्षिका सविता सातव यांना नुकताच पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा २०१४ चा ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार मिळाला आहे. शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
सातव यांनी १०वीचा गणित विषयाचा शाळेत १०० टक्के निकाल लावण्यात यश मिळविले आहे. दर वर्षी हा निकाल १०० टक्के लावण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
केवळ गणवेश नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविणारे पालक देखील आहेत. अशा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, शिक्षणाबाबत उदासीन असलेल्या पालकांशी संवाद साधून या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातव यांनी विशेष प्रयत्न केले. या शिवाय महिला सबलीकरणासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला आहे.
त्या स्वत: दोन महिला बचतगट चालवतात. किशोरवयीन मुलींच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. भीमथडी बचतगट यात्रेत देखील त्यांनी सहभाग घेतला आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मुलांचे दाखले देण्यासाठी त्या मदत करतात.

१५ मुलांना घेतले दत्तक
४मुलांना शिक्षण देण्यासाठी आधुनिक तंत्राचा, संगणकाचा त्यांनी वापर करण्यास प्राधान्य दिले. अध्यापनासाठी एलसीडी प्रोजक्टरचा वापर करून स्वत:चे ‘पावर पॉर्इंट’ प्रात्यक्षिक तयार केले.
४या माध्यमातून मुलांना अद्ययावत शिक्षण देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. या शिवाय गरजू विद्यार्थ्यांना सातव यांनी शिक्षणासाठी दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले आहे. त्यांनी जवळपास १५ मुलांना दत्तक घेतले आहे.

सविता सातव
बारामती

दुर्गम भागात शिक्षण देणारी आधुनिक सावित्री
पौड : मुळशी तालुक्यातील पश्चिम पट्टा हा अतिशय दुर्गम व डोंगराळ क्षेत्रात मोडत असल्याने या भागातील जि. प. शाळांवर काम करायला जाण्यासाठी शिक्षिका तर सोडाच; पण शिक्षकही तयार नसतात. अशा परिस्थितीत पौडपासून १२ किमी दूर असणाऱ्या मांदेडे या दुर्गम शाळेत सलग ११ वर्षे व आता मुळशी धरण परिसरात असलेल्या सोनारवाडी या शाळेवर कार्यरत असलेल्या एका उच्चशिक्षिकेने आपल्या नोकरीच्या कालावधीत गेली १३-१४ वर्षे केवळ पोटार्थी नोकरी न करता डोंगरी भागातील आदिवासी व गरीब मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येते.
स्वत: एम.ए. (इंग्लिश) व डी.एड.पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्या बागुल यांनी आपल्या नोकरीची सुरुवात मांदेडे येथील जि. प. शाळेत केल्यानंतर शिक्षणातील विविध उप्रकम या शाळेत राबवले आहेत. या भागातील कातकरी पाडे व धनगरवाड्यांवरील मुली शिक्षणासाठी शाळेत येत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन त्या मुलींच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन, या भागातील प्रत्येक मुलगी प्राथमिक शिक्षणासाठी शाळेत येईल, असा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणून अनेक आदिवासी मुली उच्चशिक्षण घेत आहेत. बागुल या स्वत: १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या असल्याने व इंग्रजी हा त्यांचा अभ्यासाचा विषय असल्याने प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषय पक्का होईल, यासाठी त्या सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या उपक्रमशीलतेची दखल घेऊन पंचायत समिती मुळशीने २००७ साली आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविले. आता त्या शिक्षकांच्या प्रशिक्षिका म्हणूनही विविध प्रशिक्षण शिबिरात काम करत आहेत.
धरणभागात आजही रस्ता, वीज, पाणी यांसारख्या भागात भौतिक विकासाचा अभाव असताना इथले विद्यार्थी आधुनिक शिक्षणाच्या बाबतीत मागे राहू नये, यासाठी त्यांना लॅपटॉप, टॅबलेट याच्या साहाय्याने इ. लर्निंगसारखा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या कार्याला विशेष साथ व मार्गदर्शन मिळाले आहे. त्यांचे पती संजीव बागुल व्यवसायाने शिक्षक असल्याने तेही भादस येथील शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

मांदेडे येथे ११ वर्षे उपशिक्षिका म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळल्यानंतरही प्रशासनाने त्यांना मुळशी धरण परिसरातील अतिदुर्गम भागात असलेल्या सोनारवाडी येथील शाळेवर नियुक्ती दिली. ज्या भागात दळणवळणाची साधने नाहीत, मोबाईलला बऱ्याचदा रेंज नसते, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागतं, अशा ठिकाणी ज्ञानाचा अखंड झरा आज वाहत आहे.

विद्या बागुल
सोनारवाडी

पर्यावरण जनजागृतीबाबत पुढाकार
बारामती : इंदापूर महाविद्यालयातील प्रा. जयश्री गटकुळ यांनी पर्यावरण जनजागृतीबाबत पुढाकार घेतला आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हसर््िाटीचा अ‍ॅन्वेशन २०१३ चा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना आनंद ग्रामसेवा प्रतिष्ठान, वडापुरी व्यसनमुक्ती संघाचा श्रीनाथ जीवन गौरव पुरस्कार देखील मिळाला आहे.
प्रा. गटकुळ यांनी पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ शोध निबंध सादर केले आहेत. राष्ट्रीयस्तरावर संशोधन स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सलग २ वर्ष संघ व्यवस्थापन म्हणून त्यांची निवड देखील झाली आहे. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्यात प्रा. गटकुळ यांचा प्रयत्न असतो. महिला व सुरक्षा समितीमध्ये त्या कार्यरत आहेत. अत्याचारित महिलांना या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी त्या पुढाकार घेतात.

जयश्री गटकुळ
इंदापूर

अखंड कार्य ज्ञानदानाचे
४विद्यार्थ्यांच्या सहभागाने त्यांनी शाळेत वृक्ष मित्र योजना शाळेत सुरु केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा व प्रज्ञा शोध परीक्षेला मुलांना बसविले जाते. त्या दृष्टीने त्यांची तयारी केली जाते.

सासवड : पुरंदर तालुक्यातील मठवाडी येथील प्राथमिक शाळेत मंजुषा शेंडकर या शिक्षिका दुर्गम भागात जाऊन शिक्षणाचे कार्य करीत आहेत. पुरंदर मधील गराडे गावापासून २ की. मी अंतरावर ही शाळा आहे. दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी जायला ब-याचदा वाहने मिळत नाही.
अशा परिस्थीतीत चालत जाऊन अखंडपणे त्या ज्ञानदानाचे कार्य करत आहे. शाळेला चांगली इमारत आहे. मुलांना शिक्षणाची गोडी आह. मंजुषा शेंडकर यांचे कडे २ री व ४ थी चा वर्ग आहे. शाळेत १०० टक्के उपस्थिती असते, असे शेंडकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सहभागाने त्यांनी शाळेत वृक्ष मित्र योजना शाळेत सुरु केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा व प्रज्ञा शोध परीक्षेला मुलांना बसविले जाते. त्या दृष्टीने त्यांची तयारी केली जाते. गेल्यावर्षी या शाळेतील एका विद्यार्थीनीने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ८ वा क्रमांक मिळवला आहे. या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ६ विद्यार्थी बसले आहेत. शाळेला आयएसओ मानांकन देण्यासाठी त्या प्रयत्नशिल आहेत. मंजुषा शेंडकर यांना मणिभाई देसाई पुरस्काराने सन्मानित केलेआहे. या भागातील पालक, ग्रामस्थ, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, असे लोकप्रतिनिधीचे शाळेला नेहमी सहकार्य असते.

Web Title: We have taken Savitri's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.