राष्ट्रहित, अन्यायाविरोधात लढण्याच्या बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत - संजय राठोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 11:14 AM2022-08-11T11:14:24+5:302022-08-11T11:14:34+5:30
बाळासाहेबांच्या विचारानं, त्यांनी जी शिकवण दिली त्याच पद्धतीनं भविष्याची वाटचाल आम्ही करणार, राठोड यांचं वक्तव्य. घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन.
नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे आहे. एका प्रकरणात आरोप झाल्यानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान, यानंतर गुरूवारी संजय राठोड यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं आणि त्यानंतर राजकीय परिस्थितीवर भाष्यही केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण शिवसेनेत आल्याचे राठोड म्हणाले.
“बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कॉलेज जीवनात आम्ही शिवसेनेत सहभागी झालो. खऱ्या अर्थानं कोणत्याही पदाची अपेक्षा मनात नव्हती. तेव्हा बाळासाहेबांचे विचारच मनात होते. राष्ट्रहित, अन्यायाच्या विरोधात लढणं त्यांचे विचार ऐकून आम्ही शिवसेनेत आलो. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही काम केलं. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांना आज पवित्र दिनी मंत्री झाल्यावर वंदन करावं म्हणून आज या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतलं,” असं संजय राठोड म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
“बाळासाहेबांच्या विचारानं, त्यांनी जी शिकवण दिली त्याच पद्धतीनं भविष्याची वाटचाल आम्ही करणार आहोत. आम्ही सर्व मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना वंदन केलं,” असंही ते म्हणाले. कोणीही आमदार नाराज नाही. आमच्या सर्व आमदारांची भूमिका एकच आहे. एकनाथ शिंदे हे आमचं नेतृत्व करत आहेत. आम्ही सर्व अधिकार त्यांना दिले आहेत. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.