घोकंपट्टीपेक्षा ज्ञान देणारे शिक्षण हवे
By admin | Published: February 22, 2016 04:14 AM2016-02-22T04:14:09+5:302016-02-22T04:14:09+5:30
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक जिज्ञासू वृत्ती असते. त्यामुळे त्यांना निव्वळ घोकंपट्टीकडे न नेता, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतील, तेव्हा
- राजेंद्र दर्डा यांची अपेक्षा
पुणे : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक जिज्ञासू वृत्ती असते. त्यामुळे त्यांना निव्वळ घोकंपट्टीकडे न नेता, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतील, तेव्हा त्याच्यातील कुतूहल, जिज्ञासा, निरीक्षणशक्ती विकसित कसे होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी
व्यक्त केली.
‘लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित ‘शिक्षणसंवाद’ परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे स्वागत करून, दर्डा म्हणाले की, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटांतील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अभिप्रेत आहे. एका बाजूला पालिका व नगरपालिकेच्या शाळा ओस पडत असताना, बीड जिल्ह्यात अशाही काही शाळा आहेत, ज्या रविवारीही सुरू असतात. नक्षलग्रस्त भागतही नवनवीन प्रयोग होत आहेत. अशा प्रयोगांचे आदान प्रदान होण्याची आवश्यकता आहे. आज पहिली ते बारावीचा विचार केला, तर १ लाख ३ हजार शाळा, २ कोटी १७ लाख विद्यार्थी, ६ लाख ८७ हजार शिक्षक आहेत. फक्त शालेय शिक्षणावर जवळपास ३० हजार कोटी खर्च आहे. एवढा खर्च युरोपातील काही देशांचा विचार केला तर या देशांचे बजेटही एवढे मोठे नाही. एखादा विद्यार्थी नांदेड किंवा औरंगाबाद विद्यापीठातून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आला, तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे एकच अभ्यासक्रम ठेवता येईल का? शाळांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मुलांना घोकंपट्टीकडे न नेता, त्यांना खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतो, तेव्हा त्याच्यातील कुतूहल, जिज्ञासा निरीक्षणशक्ती विकसित कसे होईल, याकडे लक्ष द्यावे; तसेच विद्यापीठातून बाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संगणक साक्षरता आणि इंग्रजी भाषा कौशल्य, आर्थिक साक्षरता आणि समाजातील निरनिराळ्या घटकांबरोबर कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.