Aditya Thackeray: 'देशात लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज', राऊतांवरील कारवाईनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 04:40 PM2022-04-05T16:40:55+5:302022-04-05T16:41:23+5:30
सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
मुंबई-
सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. संजय राऊतांवर झालेली कारवाई राजकीय सूडबुद्धीतून झालेली असल्याचा आरोप राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसंच देशात आता लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचंही ते म्हणाले.
"एखाद्या राजकीय नेता आधी कुणावर कारवाई होणार हे जाहीर करतो आणि दुसऱ्याच दिवशी यंत्रणांकडून कारवाई होते. धमक्या देऊन कारवाई होऊ लागल्या आहेत हे अतिशय धोक्याचं आहे. त्यामुळे देशात आता लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले. राजकीय सूडभावनेतून ईडीच्या कारवाया सुरू आहेत. पण शिवसेना अशा कारवायांमुळे थांबणार नाही. आम्ही लढा देऊ, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई
ईडीकडून आज अलिबागमधील संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याशी निगडीत ८ प्लॉट आणि दादरमधील फ्लॅटवर कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणच्या मालमत्ता ईडीनं जप्त केल्या आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील पैशातून ही जमीन खरेदी केल्याचा ईडीला संशय आहे. याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याच प्रकरणाशी निगडीत व्यवहारांवर ईडीनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.