आम्ही चालवू हा पुढे वारसा..!
By admin | Published: February 7, 2017 11:48 PM2017-02-07T23:48:35+5:302017-02-07T23:48:35+5:30
महाराष्ट्राचं राजकारण सोळा घराण्यांभोवती फिरत असे. आता ते आणखीकाही घरं पुढे येऊन चौसष्टहून अधिक घरांच्या पुढं गेलं आहे.
महाराष्ट्राचं राजकारण सोळा घराण्यांभोवती फिरत असे. आता ते आणखीकाही घरं पुढे येऊन चौसष्टहून अधिक घरांच्या पुढं गेलं आहे. गावागणिक नवी घराणी तयार झाली आहेत. आजवर बारामतीचे पवार, अकलुजचे मोहिते-पाटील, साताऱ्याचे भोसले, सांगलीचे पाटील, नाशिकचे हिरे, फलटणचे निंबाळकर, बीडचे क्षीरसागर, सोळुंके, नगरचे विखे, थोरात अशी काही नामांकित राजकीय घराणी महाराष्ट्राला सुपरिचित होती. या घराण्यांमधील पहिल्या-दुसऱ्या पिढीने सहकाराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधान भवानापर्यंत आपली छाप उमटवली. याच पिढीने राज्यात सहकारी साखर कारखानदारी रुजवली, दुग्धव्यवसाय वाढविला, फळबागा फुलविल्या आणि शिक्षणक्षेत्राची नवी दुकानंही उघडली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे, बाळासाहेब भारदे, वि.स. पागे, उद्धवराव पाटील, शरद पवार या धूरिणांनी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय संतुलन बिघडू दिलं नाही. अगदी निवडणुकीच्या काळातही प्रचाराची वैचारिक पातळी ढळू नये, यासाठी ते दक्ष असत. यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, डांगे,
बॅ. नाथ पै, मधू दंडवते, बापू काळदाते आदींनी महाराष्ट्राचं राजकीय समाजजीवन वैचारिकदृष्ट्या समृद्ध केलं. तो वारसा आम्ही हरवून बसलो आहोत. हल्लीचा वारसा घराण्यांचा आहे. पण तो गायकीतील घराण्यांसारखा सुरेल नाही. गायकीतील घराण्यांची बैठक पक्की असते. सम, नियम, अरोह आणि अवरोहांशी बांधिलकी असते. आणि मुख्यत: ती गुरू-शिष्य परंपरेतून वृद्धिंगत झालेली असतात. मात्र राजकीय घराण्यांनी ‘गुरु’त्वाकर्षणानुसार आपली दिशा बदलती ठेवल्याने हल्लीचं राजकारण बरंच प्रवाहपतित झाल्याचं दिसतं.
१९९५ पासून महाराष्ट्राच्या राजकारणाने कूस बदलली आणि राज्यात सत्तांतर घडून आले. हे परिवर्तन घडवून आणण्यात बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर अशा नव्या घराण्यांच्या प्रथमपुरुषांचा सिंहाचा वाटा होता. या राजकीय बदलातूनदेखील राज्यात नवी राजकीय घराणी उदयास आली. शिवसेनेतून पुढे आलेले एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, गणेश नाईकांची दुसरी पिढी राजकारणात आली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा, विलासराव देशमुख यांच्यानंतर अमित तर आर. आर. पाटील यांचा वारसा त्यांची कन्या चालवित आहे. तिकडे खडसे यांनीही स्नुषा रक्षा खडसे यांच्या माध्यमातून खासदारकी घरातच ठेवली आहे. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तर आपले अख्खे कुटुंबच गडचिरोली जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरविले आहे.
समाजाच्या सर्वच क्षेत्रांत मागील पिढीचा वारसा पुढची पिढी चालवित असल्याने केवळ राजकीय घराणेशाहीबाबत एवढी चर्चा का, असा युक्तिवाद नेहमीच केला जातो. वरकरणी तो समर्थनीय वाटत असला तरी, राजकारण हे संधीचे क्षेत्र असल्याने अशा घराणेशाहीमुळे ज्यांच्या पाठीशी कोणीही नाही अशा होतकरू तरुणांची संधी नाकारली जाते. चार-चार पिढ्यांपर्यंत एकाच कुटुंबाच्या हाती सगळी सत्तासूत्रे गेल्याने दुर्बल घटकांतील कार्यकर्ते वंचित राहतात. मग सतरंज्या उचलण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे हीच बलुतेदारी करायची का? राजकीय घराण्यांच्या पलीकडचा विचार केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट खऱ्या अर्थाने विस्तारणार नाही. नेत्यांनी स्वत:च्या घरापेक्षा कार्यकर्त्यांचा विचार केला तर कवी जगदीश खेबुडकरांनी वरील गाण्यातून व्यक्त केलेली वारसदारी निश्चित अनुकरणीय ठरेल.
- नंदकिशोर पाटील