आम्ही रोज पाहतो मरण, तरीही रचतो सरण, पंचगंगा स्मशानभूमीतील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 10:23 AM2021-04-23T10:23:20+5:302021-04-23T10:25:50+5:30
: कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाला खांदा तर दूरच, त्याच्या जवळही जाण्यास नातेवाईक धजावत नसताना, थेट कोरोनाशी सामना करीत पंचगंगा स्मशानभूमीतील २० कर्मचारी रोज अशा मृतदेहांवर अग्निसंस्कार करत आहेत. मृतदेहाला हाताळणे म्हणजे साक्षात मरणालाच आमंत्रण देण्यासारखे. मात्र आपले पहिले कर्तव्य म्हणून या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत २६०, तर गेल्या चार दिवसांत ८५ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. पुरेशी दक्षता घेतल्याने त्यापैकी आजअखेर एकही कोरोनाबाधित झालेला नाही, ही चांगली बाब आहे.
सचिन भोसले
कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाला खांदा तर दूरच, त्याच्या जवळही जाण्यास नातेवाईक धजावत नसताना, थेट कोरोनाशी सामना करीत पंचगंगा स्मशानभूमीतील २० कर्मचारी रोज अशा मृतदेहांवर अग्निसंस्कार करत आहेत. मृतदेहाला हाताळणे म्हणजे साक्षात मरणालाच आमंत्रण देण्यासारखे. मात्र आपले पहिले कर्तव्य म्हणून या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत २६०, तर गेल्या चार दिवसांत ८५ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. पुरेशी दक्षता घेतल्याने त्यापैकी आजअखेर एकही कोरोनाबाधित झालेला नाही, ही चांगली बाब आहे.
गेल्या दोन महिन्यांत २६० कोरोनाग्रस्त मृतांवर पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी अग्निसंस्कार केले आहेत. गेल्या चार दिवसांत तर मोठी भयाण स्थिती येथे आहे. तीन पाळीत ८ - ८ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकूण ८५ कोरोनाग्रस्तांवर, तर इतर व्याधींनी मृत झालेले २५, अशा एकूण ११० जणांवर अंत्यसंस्कार केले. प्रत्येक कर्मचारी पीपीई कीट घालून, सॅनिटायझरचा वापर करून हे कार्य करीत आहे.
अनेकांच्या अंत्यसंस्काराला एक, दोन अथवा काहीवेळेला कोणच नसते. अशावेळी त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक होऊन तो मृतदेह हाताळणे आणि सर्व सोपस्कारही येथील कर्मचारी करतात. दुसऱ्यादिवशी रक्षाही ते विसर्जित करतात. कोरोना मृतावर एक मण लाकूड व साडेचारशे शेणी हे कर्मचारी रचतात.
त्यानंतर स्वत:च कापूर घेऊन त्यावर आपलाच नातेवाईक असल्याप्रमाणे मृतदेहाला संसारी मोहातून सुटका मिळावी, म्हणून हराटी मंत्र म्हणून अग्निसंस्कार करतात. ऐन उन्हाळ्यात कोरोना संसर्गाने मृत होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एकाबाजूने सरणाच्या आगीच्या ज्वाळा आणि वरून उन्हाच्या तीव्र झळा सोसून हे कर्मचारी इमाने इतबारे सेवा बजावत आहेत.
अशी घेतली जाते दक्षता
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पीपीई कीट, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार केल्यामुळे एकाही कर्मचाऱ्याला अद्यापही कोरोना संसर्ग झालेला नाही. एक कोरोनाग्रस्त मृतदेह आल्यानंतर पूर्णपणे प्लास्टिकने मृतदेह झाकलेला असतो. तरीसुद्धा काळजीपोटी कर्मचारी पीपीई कीट घालूनच तो मृतदेह रचलेल्या सरणावर ठेवतात. त्यानंतर शेणी, कापूर लावून दहन करतात. दहन झाल्यानंतर सॅनिटायझरने सर्व शरीराची स्वच्छता करतात. प्रत्येकास एन-९५ मास्क सक्तीचा आहे.
हे आहेत बहाद्दर कोरोना योद्धे...
अरविंद कांबळे (आरोग्य निरीक्षक), बाबासाहेब भोसले, सुनील कांबळे, तुळशीदास कांबळे, प्रदीप बानगे, अनिल चौगले, विलास कांबळे, करण बानगे, विल्सन दाभाडे, हिंदुराव सातपुते, अशोक गवळी, रवी कांबळे, जयदीप कांबळे, वैभव लिगडे, प्रसाद सरनाईक, अमोल कांबळे, आशिष बानगे, राजू कांबळे यांचा समावेश आहे.
दृष्टिक्षेप...
- एकूण दहन बेडची संख्या - ४७
- कोरोना मृतांसाठी राखीव - २७ बेड
- नॉनकोविड मृतांसाठी राखीव - २०
- कर्मचारी संख्या - २०
- कामाच्या वेळा : २४ तास
- गॅसदाहिनी - १
- दोन महिन्यात कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार - २६०
- गेल्या चार दिवसांत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार - ८५
पीपीई कीट, सॅनिटायझरचा पुरेपूर वापर करून कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करतात. धोका असला, तरी हे काम कर्मचारी अव्याहतपणे करत आहेत.
- अरविंद कांबळे,
आरोग्य निरीक्षक