आम्ही अन्याय, अत्याचारासह भ्रष्टाचाराची हंडी फोडू; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:10 AM2018-09-04T03:10:49+5:302018-09-04T03:11:02+5:30
तुम्ही दहीकाल्याची हंडी फोडा, आम्ही श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदा पथकांना सोमवारी शुभेच्छा दिल्या.
ठाणे : तुम्ही दहीकाल्याची हंडी फोडा, आम्ही श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदा पथकांना सोमवारी शुभेच्छा दिल्या. स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात त्यांनी हजेरी लावली. या वेळी जय जवान गोविंदा पथकाने अत्यंत सफाईदारपणे नऊ थर रचून सलामी दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. ठाण्यातील दहीहंडी उत्सवावरील शिवसेनेचा वरचष्मा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीने पुसला गेला. शिवसेनेच्या नेत्यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी फडणवीस ठाण्यात हजर असेपर्यंत चक्क शुकशुकाट होता.
ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्र्यांनी दुपारी हजेरी लावली आणि गोविंदा पथकांचे कौतुक केले. स्वामी प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी हिरानंदानी मेडोज येथे प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी सकाळपासून अनेक मराठी कलावंतांसह आमदार, खासदारांनी हजेरी लावली होती. ठाण्यातील सर्वात मोठी दहीहंडी असलेल्या या उत्सवात १० थरांसाठी २५ लाखांचे पारितोषिक लावण्यात आले होते, तर एकूण ५० लाखांची पारितोषिके वितरित केली गेली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुपारी ३ च्या सुमारास उत्सवाला भेट दिली. ढोलताशांचा गजर सुरू होता आणि डीजेवर ठसकेबाज गीतांचा दणदणाट सुरू होता. त्या तालावर गोविंदा आणि सर्वसामान्य अक्षरश: थिरकत होते. या परिसरात पोलिसांचा तुफान बंदोबस्त ठेवला होता.
आतापर्यंत ठाण्यात दहीहंडी म्हणजे शिवसेना हे समीकरण होते. जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या दोन वर्षांत आपली हंडी बंद केल्यानंतर हीच संधी साधत स्वामी प्रतिष्ठानचे पाटील यांनी दहीहंडीचे आयोजन केले. मोठ्या रकमेची बक्षिसे, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, मीडियाची गर्दी यामुळे ठाण्यात शिवसेनेऐवजी भाजपाच्या हंडीचा बोलबाला होता.
या वेळी मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नऊ थरांची सलामी देत ठाण्यातील थरांची परंपरा राखली. स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या आदिवासी मुलींनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. पाटील यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख, तर महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांसाठी दोन लाखांचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी दिला. या वेळी खा. कपिल पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर आदी उपस्थित होते.
उत्सवावरील शिवसेनेचा वरचष्मा पुसला गेला
ठाण्यात दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थरांवर थर रचणाऱ्या गोविंदा पथकांचे कौतुक केले. तसेच आम्ही अन्याय, अत्याचाराची हंडी फोडू, असा विश्वास उपस्थितांना दिला. ठाण्यातील दहीहंडी उत्सवावरील शिवसेनेचा वरचष्मा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीने पुसला गेला.