आम्ही कर्जमाफी करून दाखवतो
By admin | Published: April 2, 2017 12:46 AM2017-04-02T00:46:04+5:302017-04-02T00:46:04+5:30
जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन तुम्ही सत्तेत येण्यापूर्वी दिले. पण हे भाजपावाले दुतोंडी आहेत.
औरंगाबाद : जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन तुम्ही सत्तेत येण्यापूर्वी दिले. पण हे भाजपावाले दुतोंडी आहेत. ते बोलतील तसे करणार नाहीत. पण आता शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. नाही तर तुम्ही खुर्च्या सोडा... आम्ही कर्जमाफी करून दाखवतो’ असे खुले आव्हान शनिवारी येथे संघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष चालूच राहणार आहे. संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पाही लगेच सुरू होत असल्याचे या नेत्यांनी आमखास मैदानावर झालेल्या या सभेत जाहीर केले. तत्पूर्वी जालना येथून ही यात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. तेथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या उपोषणाची सांगता संघर्ष यात्रेच्या नेत्यांच्या हस्ते करण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदींसह जवळपास २०-२५ जणांनी शुक्रवारपासूनच उपोषण सुरू केले होते. घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर भुसारे यास मंत्रालयात झालेल्या मारहाणीची कथा यावेळी अजित पवार यांनी सांगितली. एका शेतकऱ्याला हात लावाल तर सर्व शेतकरी पेटून उठले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले आणि उपस्थितांना हात वर करायला लावून याची संमती घेतली. यासाठी रास्ता रोको करा, मंत्र्यांना गावात प्रवेशबंदी करा, असे त्यांनी सुचविले. (प्रतिनिधी)