आम्ही केजरीवालांच्या पाठीशी, ही वेळ वाद घालण्याची नाही; पवार राज्यसभेत पाठिंबा देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 07:23 AM2023-05-26T07:23:01+5:302023-05-26T07:23:59+5:30
लोकशाहीसाठी संसदेत राष्ट्रवादी ‘आप’ला पाठिंबा देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील लोकशाही वाचविण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असे सांगत केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात संसदेत आम आदमी पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही केंद्राने अध्यादेश काढून नायब राज्यपालांनाच प्रशासकीय अधिकार दिल्याचा निषेध करत या अध्यादेशाचा राज्यसभेत विरोध करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘आप’च्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. केंद्राचे हे धोरण म्हणजे देशाअंतर्गत लोकशाहीवरील संकट आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने या अध्यादेशाचा राष्ट्रवादी विरोध करेल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गुरुवारी पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग, राघव चड्डा आणि दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. केंद्राच्या या असंवैधानिक विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केजरीवाल यांनी पवारांचे आभार मानले. तर, सध्या देशाच्या लोकशाहीवरील संकट दूर करण्याची क्षमता पवार यांच्यातच आहे, असे भगवंत मान यावेळी म्हणाले.
केजरीवालांचे ‘ते’ शब्द मी बोलू शकत नाही - फडणवीस
सोलापूर : अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी शरद पवार यांच्याबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी माझ्या तोंडून बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही वक्तव्य केले होते. केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध म्हणून ही मंडळी आता एकत्र येत आहेत. मात्र, मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास असून, ते आता वैश्विक नेते झाले आहेत, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सोलापुरातील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ही वेळ वाद घालण्याची नाही
ही वेळ आपण कोणत्या पक्षाचे किंवा तुमची नीती काय आहे यावर वाद घालण्याची नाही. ही वेळ आहे लोकशाही वाचविण्याची, संसदीय लोकशाही वाचविण्याची. तसेच सामान्य जनतेचा मतदानाचा अधिकार वाचविण्याची वेळ आहे.
- शरद पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस