'आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न केला, पण...', असदुद्दीन ओवेसी स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 07:05 PM2024-11-15T19:05:03+5:302024-11-15T19:05:48+5:30
'माझ्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो.'
Asaduddin Owaisi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच नेते आपल्या उमेदवारांसाठी आपली पूर्ण ताकद लावत आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसीही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरे करत आहेत. यादरम्यान त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडीत जागा का मिळाली नाही?
'मुस्लिमांना राजकीय नेतृत्व नाही, बार्गेनिंग पॉवर नाही, त्यामुळे त्यांचे राजकीय सक्षमीकरणही कमी झाले आहे. मुस्लिमांना राजकीयदृष्ट्या अस्पृश्य बनवले आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी भाजप आणि शिंदे सेनेच्या विरोधात मतदान केले होते. विधानसभेतील लोकांची मतदान पद्धत वेगळी असेल. इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिले होते की, आम्हालाही महायुती सरकारला रोखायचे आहे, त्यामुळे आम्ही मविआत येऊ शकतो. आम्ही आमच्या बाजूने मविआत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.'
ओवेसींना सोबत घेतल्याने हिंदू मतदार नाराज होतील, अशी महाविकास आघाडीला भीती आहे का?
या प्रश्नाला उत्तर देताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'माझ्या पक्षाने हरियाणाची निवडणूक लढवली नाही. मग तिथे भाजप कसा जिंकला? मविआवाले आम्हाला भाजपची बी टीम म्हणतात. पण, तुम्हाला तुमच्या आघाडीत आम्हाला सामील करायचे नसेल, तर माझा एक राजकीय पक्ष आहे. माझे दोन आमदार आहेत, अनेक ठिकाणी नगरसेवक आणि पंचायत सदस्य आहेत. त्यामुळेच मला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि मी लढवेल.'
देवेंद्र फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीसांनी त्यांना रझाकारांचे प्रतिनिधी म्हटल्यावर ओवेसी म्हणाले, 'भाजप शिवीगाळ आणि खोटे आरोप करणारा पक्ष आहे. एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले विद्यमान उपमुख्यमंत्री बैचेन आहेत. मुख्यमंत्री होण्याच्या आपल्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. त्यामुळे असंसदीय शब्द वापरून ते इतक्या खालच्या पातळीवर गेले आहेत,' अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली.