आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 06:58 AM2024-07-25T06:58:57+5:302024-07-25T07:00:19+5:30

मी आता रॅलींची तयारी करणार आहे. ७ ते १३ ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी वेळ दिला तेथे रॅली होणार आहे १३ ऑगस्टला नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली.

We used to give 30-40 of our MLAs in the assembly; manoj Jarange's fast suspended, charges against Fadnavis | आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप

आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क 
वडीगोद्री (जि. जालना)/मुंबई: मला जेलमध्ये टाकून मारायचे ठरवले असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत वॉरंट ही न्यायिक प्रक्रिया असून, त्यात कोणताही डाव नाही असे स्पष्ट केले.

येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ मिळावा, या कारणास्तव मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. बुधवारी दुपारी १:३० वाजता अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने ज्यूस व पाणी पिऊन त्यांनी आपल्या पाचव्या उपोषणाची सांगता केली. इथे सलाईनवर पडून राहण्यात उपयोग नाही. त्यापेक्षा मी मतदारसंघांची तयारी करतो. मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या आमदारांचा बंदोबस्त करायचा आहे, असा इशारा जरांगे यांनी दिला.

मी आता रॅलींची तयारी करणार आहे. ७ ते १३ ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी वेळ दिला तेथे रॅली होणार आहे १३ ऑगस्टला नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली.

२ ऑगस्टला जरांगे न्यायालयात हजर होणार
पुणे : नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मागील सुनावणीला हजर न राहिल्याने न्यायालयाने मंगळवारी अटक वॉरंट जारी केले होते. त्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील २ ऑगस्ट रोजी पुढील तारखेला न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती त्यांचे वकील संतोष खामकर यांनी बुधवारी न्यायालयास दिली, हे वॉरंट रद्द करण्याची विनंती त्यांनी केली.

आम्ही शंभूराजे नाटक बसवले त्याच्यात तोटा आला. आता काय करता डोक्यात दगड घालता का? त्यात आम्ही तिघे होतो. तिघांनी तोटा वाटून घेतला. हे जुने प्रकरण त्यांनी आमच्या गळ्यात गुंतवून दिले.
- मनोज जरांगे पाटील

आपल्याला किमान ३०-४० आमदार द्यायचे
मी ४० आमदार पाडायची तयारी करतो. विधानसभेत आपले बोलायला कोणी नाही, पिकांना भाव मिळावा यासह आपले प्रश्न मांडायला कोणी नाही. त्यामुळे बारा बलुतेदारांना निवडणुकीत उभे करणार, आमच्या विचारांचे ओबीसी निवडून आणणार, असेही ते म्हणाले. २९ ऑगस्टला आम्ही ठरवणार २८८ पाडायचे की उभे करायचे. आपल्याला किमान ३०-४० आमदार द्यायचे आहेत, असेही जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांची कोर्टात जी केस आहे, ती २०१३ ची आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गैरजमानती वॉरन्ट निघालेला होता, कोर्टात हजर राहून त्यांनी तो रद्द करविला होता. एखादी व्यक्ती तारखेवर कोर्टात हजर झाली नाही, तर असा वॉरन्ट निघतो आणि ती हजर झाली की वॉरन्ट रद्द होतो, ही न्यायिक प्रक्रिया आहे. राजकीय आंदोलनांमध्ये आमच्यावर केसेस झाल्या तेव्हाही असेच व्हायचे. त्यामुळे जरांगेंना तुरुंगात टाकण्याचा डाव वगैरे काहीही नाही. तरीही ते माझ्यावर आरोप करीत आहेत. मला टार्गेट करून कोणाला फायदा होतो, माझी शक्ती, माझ्यावरील लोकांचे प्रेम कोणासाठी घातक आहे, कोणाला माझ्यापासून धोका वाटतो, माझ्याविरुद्ध कोण इको सिस्टीम चालवितो हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Web Title: We used to give 30-40 of our MLAs in the assembly; manoj Jarange's fast suspended, charges against Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.