'गृह' खात्याचा आग्रह, भाजपाच्या निर्णयाकडे लक्ष; गुलाबराव पाटील काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 11:41 AM2024-12-03T11:41:19+5:302024-12-03T11:55:22+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडे हवे होते त्यांचा फायदा झाला असता असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
मुंबई - एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावं ही आमची पूर्वीपासून मागणी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळालं असतं तर फायदा झाला असता पण आमच्या नेतृत्वानेच सांगितले, माझी कुठलीही आडकाठी राहणार नाही. शेवटी आम्ही एकनाथ शिंदे यांचे आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत. एकनाथ शिंदेंनी सत्तेत राहावं, त्यासाठी उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपद त्यांना दिलं जावं. भाजपा नेत्यांना काय वाटते हे माहिती नाही, परंतु केंद्रीय नेतृत्वाकडे ही मागणी केली आहे. ते जो निर्णय करतील तो मान्य करू असं शिंदेंनी सांगितले आहे. परंतु एकनाथ शिंदेंनी सत्तेत राहावे ही आमची इच्छा आहे असं विधान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, एकनाथ शिंदे यांनी सत्तेत राहावे, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं ही आमची मागणी आहे. एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय नेतृत्व आणि इथल्या नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांचा सन्मान राखला जाईल. केंद्रीय नेत्यांकडे आम्ही गृहमंत्रिपदाची मागणी केली आहे. जे केंद्रीय नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं स्वत: एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे ही बाब आता राज्यात नव्हे तर केंद्राच्या नेतृत्वावर अवलंबून आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे ही सगळ्यांची इच्छा होती. शेवटी ३ पक्षांचे सरकार आहे, तिन्ही पक्षाचे समतोल साधण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला त्यामागे आम्ही आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडे हवे होते त्यांचा फायदा झाला असता. परंतु नेतृत्वाने ही गोष्ट सोडल्यामुळे आम्ही त्यावर बोलणं उचित राहणार नाही. गृहमंत्रिपद एकनाथ शिंदेंना मिळावं ही आमची मागणी आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, संजय राऊतांनी आतापर्यंत शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली, उद्धव ठाकरेंना संपवलं, काँग्रेसलाही संपवलं. हा माणूस जिथं जाईल तिथे रोगट आहे. संजय राऊत चिकनगुनियासारखा आहे. हा कुणाचा नाही, नौटंकी बोलणे, बाळासाहेब बोलतात त्यासारखं बोलण्याचं नाटक करणे. उद्धव ठाकरे यांना चुकीच्या माहिती देऊन वेडे केले. आज परिस्थिती शिवसेना २० आमदारांवर आणून ठेवली आहे असा टोला गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना लगावला.
महायुतीत नाराजीनाट्य नाही
महायुतीत नाराजीनाट्य नाही. मागणी करणे यात चुकीचे काही नाही. केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल ते मान्य करू. आजारपणामुळे ते २ दिवस गावी गेले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील असं जनतेला वाटत होते. आम्ही मागणी केली, परंतु ते होत नाही. त्यामुळे त्यांनी केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य करण्याचं ठरवलं. आम्ही सगळे अधिकार एकनाथ शिंदेंना दिलेत, ते जे काही ठरवतील आम्ही त्याचे पालन करू असं गुलाबराव पाटलांनी सांगितले.
माझ्या विधानाचा विपर्यास केला
शिवसेना-भाजपाची युती झाली, आम्ही मंत्रिपदाला तिलांजली देऊन उठाव केला. हिंदुत्वाकरता, बाळासाहेब ठाकरेंचे विचार टिकवण्याकरता आम्ही भाजपासोबत युती केली. सत्ता आल्यानंतर अजितदादा आले. तेव्हाही आम्ही विरोध केला नाही. भाजपा नेतृत्वाने जे ठरवले ते आम्ही मान्य केले. जर ते आले नसते तर कदाचित आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या आणि आमच्या जागा जास्त आल्या असता असा माझ्या विधानाचा अर्थ होता. परंतु काहींनी तो वेगळा काढला. एकनाथ शिंदे आणि भाजपाची युती हिंदुत्वाकरता, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी झाली आहे. ही विचारांची युती त्यामुळे तुटण्याचा संबंध नाही. एकनाथ शिंदे आजारी होते, ते बरे झालेत. त्यांच्या आदेशाने आम्ही पुन्हा कामाला लागलोय. तब्येतीच्या कारणास्तव ऑनलाईन बैठका होणार आहेत. त्यात काय होईल ते आम्ही सांगू असं गुलाबराव पाटलांनी माहिती दिली.