आम्हालाही न्याय हवाय... पीडित पुरुषांची मागणी
By admin | Published: May 15, 2017 06:47 AM2017-05-15T06:47:29+5:302017-05-15T06:47:29+5:30
नवरा काय तर फिरायलाच नेत नाही... तो माझे ऐकतच नाही... मला तुझ्या आईवडिलांबरोबर राहायचे नाही...
नम्रता फडणीस।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नवरा काय तर फिरायलाच नेत नाही... तो माझे ऐकतच नाही... मला तुझ्या आईवडिलांबरोबर राहायचे नाही... आपण वेगळे राहू...अशा अनेक छोट्या-मोठ्या कुरबुरी सगळ्याच घरात ऐकायला मिळतात, मात्र काही महिला हे वाद इतके विकोपाला नेतात की कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत सरळ तक्रारी करून पतीसह त्याच्या कुटुंबीयांना न्यायालयात खेचतात. समाजात महिलांच्या त्रासाला बळी पडणाऱ्या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांचेही म्हणणे पोलिसांनी ऐकून घ्यायला हवे, या त्यांच्या म्हणण्याकडेही दुर्लक्ष केलं जातेयं; म्हणून आता पुरुषांना हवाय महिलांप्रमाणेच स्वतंत्र कायदा!
चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. काही दिवसांपूर्वी पुण्यात किरण पाटील या एका उच्चशिक्षिताने आपल्या मुलीसह आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, त्यांच्या पत्नीने देखील त्यांच्यासह कुटुंबीयांविरूद्ध न्यायालयात केस दाखल केली होती़ मागील महिन्यात सलील नाईक यानेही याच कारणास्तव आत्महत्येला जवळ केले. खरंच त्यांचे काय चुकले होते? आज समाजात असे अनेक पुरुष आहेत जे पत्नीने कौटुंबीक हिंसाचार कायद्यांतर्गत केलेल्या खोट्या तक्रारींचे शिकार ठरलेले आहेत. त्यामुळे पत्नीकडून पुरुषांच्या केलेल्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
वाढदिवसाला नवऱ्याने बायकोला फोन केला नाही, तिच्या मनासारखे तो वागत नाही, मग चढा पोलिसांची पायरी. या गोष्टींमुळे पत्नीकडून पतीला विनाकारण त्रास दिला जात आहे. मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे समुपदेशकांकडे किंवा कोर्टातही पुरुष आसवांना वाट मोकळी करून देतो. शेवटी आत्महत्येशिवाय त्यांना गत्यंतर उरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुरुषांचीही एक बाजू असते ती पोलिसांनी ऐकून घेतली पाहिजे. सगळेच पुरुष सारखे नसतात, याकडे पुरुष हक्क संरक्षण समितीने लक्ष वेधले आहे.