आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापू पाटलांचा राज ठाकरेंना विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 02:39 PM2024-03-25T14:39:28+5:302024-03-25T14:40:47+5:30
Raj Thackeray's MNS merge with Shiv Sena News: राज ठाकरेंच्या मनसेचं आणि शिंदेंच्या शिवसेनेचं विलीनीकरण करून राज ठाकरेंकडे नेतृत्व सोपवावे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सोलापूर - shahaji bapu patil on Raj Thackeray ( Marathi News ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजपा युती होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच काहींनी तर शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरेंना सोपवणार असा दावाही केला. माध्यमांतही या बातम्या झळकू लागल्या. परंतु भाजपा-मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सध्या मौन बाळगलं आहे.
आता राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व दिले तर त्याचा स्वीकार शिंदे गटातील आमदार, खासदार करणार का असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर पत्रकारांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना हा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात राज ठाकरेंकडे नेतृत्व देण्यास विरोध केला. आमदार शहाजी पाटील म्हणाले की, मी सध्या सांगोल्यात आहेत. मला अशाप्रकारच्या प्रस्तावाबाबत कुठलीही माहिती नाही. त्यात मी अज्ञानी आहे. परंतु आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेंच राहिले पाहिजे. त्यात आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही. त्यात काही असेल त्याला आम्ही नकार देऊ. असं अजिबात चालणार नाही असं आम्ही स्पष्ट सांगतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भाजपानं राज ठाकरेंसमोर तीन पर्याय ठेवल्याची चर्चा
राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते दोनवेळा भेटले. फक्त लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या एवढाच मर्यादित विषय नव्हता, तर राज यांना महायुतीसोबत नेहमीसाठी कसे आणता येईल या दृष्टीने व्यापक चर्चा सुरू असल्याने शिंदे, फडणवीस, राज यांच्यापैकी कोणीही माध्यमांसमोर स्पष्ट सांगायला तयार नाही असे बोलले जात आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि मनसे यांचे विलीनीकरण हा विषय दोन्हीतिन्ही बैठकांमध्ये चर्चिला गेला. त्या बाबत राज यांनी कोणताही शब्द दिला नाही. ते या प्रस्तावासाठी अनुकूल नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपानं राज ठाकरेंसमोर ३ पर्याय ठेवलेत, त्यात शिवसेनेसोबत विलिनीकरण, लोकसभेला पाठिंबा आणि विधानसभेत जास्त वाटा, लोकसभेला जागा, विधानसभेत कमी जागा असे प्रस्ताव ठेवलेत. परंतु त्यातील पहिल्या प्रस्तावावर राज ठाकरे स्वत: अनुकूल नसल्याचे बोलले जाते.