राज ठाकरे आम्हाला हवेत; बाळासाहेबांचे विश्वासू शिवसेना खासदार गजानन किर्तीकर असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 04:03 PM2023-03-24T16:03:28+5:302023-03-24T16:06:16+5:30
पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी चर्चा करा आणि युतीला मान्यता द्या असं म्हटलं होते. परंतु आता शक्यता कमी आहे असंही खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं.
मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर महाराष्ट्राची लूट करून सूरतेला जाणारे हे एकमेव आहे अशी टीका केली. त्याचसोबत उद्धव ठाकरे जातील तिथे सभा घ्यायला जाऊ नका, महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष द्या असा सल्ला दिला. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेची तूर्तास शिंदे-भाजपाशी जवळीक नाही असेच चित्र दिसून आले. त्यावरून शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी भाष्य केले आहे.
खासदार गजानन किर्तीकर म्हणाले की, गुढीपाडवा मेळाव्याला मनसेची जाहीर सभा होती, त्यांचे स्वातंत्र्य अस्तित्व आहे. राजकारणात स्वातंत्र्य अस्तित्व टिकवायचे असेल तर त्या पक्षाच्या प्रमुखाला अशी भाषा बोलावी लागते. एकदम आम्ही भाजपा-एकनाथ शिंदेंकडे समर्पित झालोय असा अर्थ कुणी काढू नये. ही बोलणाऱ्यांची स्ट्रॅटर्जी आहे. ते आमच्यासोबत आहेत. आम्हाला ते हवेत असं त्यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंनी संधी गमावली
शिवसेनेत जे काही घडले त्याचं कुठल्याही शिवसैनिकाला दु:ख आहे. समेट झाला असता, पक्ष एकसंघ राहिला असता परंतु पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी योग्यवेळी जी पावले टाकायला हवी होती ती त्यांनी टाकली नाही. समेट व्हावा यासाठी आम्ही खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडे समेट करा अशी मागणी केली होती. पक्ष एकसंघ ठेवा असं म्हटलं. भाजपासोबत युती नवीन नाही. मुख्यमंत्री शिवसैनिकाला केले हे तुम्ही स्वीकारा असं उद्धव ठाकरेंना सांगितले. पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी चर्चा करा आणि युतीला मान्यता द्या असं म्हटलं होते. परंतु आता शक्यता कमी आहे असंही खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं.
फडणवीस-ठाकरे एकोपा होईल असं नाही
फडणवीस-ठाकरे हे दृश्य फार काही एकोपा होईल असं नाही. विधान भवनात येण्यासाठी एकच गेट आहे. त्यामुळे वाहने बाहेर उभी करून विधिमंडळाच्या पायऱ्यांपर्यंत एकत्र यावे लागते. त्यावेळी अनेकदा नेते भेटतात. मग चर्चा करत संवाद साधत ते सभागृहापर्यंत जातात. त्यामुळे एकत्र येतील वैगेरे असे काही नसते असं सांगत खा. गजानन किर्तीकर यांनी देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित विधान भवनातील एन्ट्रीवर प्रतिक्रिया दिली आहे.