"शिंदेंना आरक्षण द्यायचंय, पण फडणवीसांना...", मनोज जरागेंचा आरोप; मुख्यमंत्री म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 05:59 AM2024-08-20T05:59:47+5:302024-08-20T07:02:08+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राजीनाम्याची भाषा केली आहे. यामुळे ते शंभर टक्के दोषी आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
मुंबई : एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे, त्यांचे माझ्यावर जरा जास्तच प्रेम आहे. पण, त्यांचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केला तर मी नुसते पदच सोडणार नाही तर राजकारण संन्यास घेईन, असे आव्हान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
फडणवीस मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले नाही, तर माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी केले. जरांगे आज जो आरोप करत आहेत, त्यावर मुख्यमंत्री शिंदेच चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतील. शिंदेंनी हा आरोप मान्य केला तर त्याचक्षणी मी राजीनामा देईन. तसेच, संन्यासही घेईन. शिंदे यांनी जेव्हा मराठा समाजाबाबत चांगले निर्णय घेतले तेव्हा मी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलो.
...म्हणूनच राजीनाम्याची भाषा : जरांगे
वडीगोद्री (जि. जालना): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राजीनाम्याची भाषा केली आहे. यामुळे ते शंभर टक्के दोषी आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. आम्ही तुम्हाला विरोधक मानलेले नाही, तुमच्यावर अशी भाषा वापरण्याची वेळ का आली, यावर विचार करा. मराठा आरक्षणाच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असेन, तर मी त्याच क्षणी राजीनामा देईन, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. त्यावर जरांगे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, शेवटी कर्ते तुम्ही आहात. तुम्ही मराठ्यांचे आरक्षण रोखले हे सत्य आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी तुम्ही रोखली. आम्ही तुम्हाला विरोधक मानले नाही. आंदोलन काळात ज्या केसेस केल्या, त्या मागे घेतल्या नाहीत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या, त्यांना तुम्ही बढती दिली. मराठ्यांविषयी जातीवादाने बरबटलेले अधिकारी आणून आम्हाला मारायला लावले. तुम्ही आमच्या महिला तडीपार केल्या, अशी टीकाही जरांगे यांनी केली.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
- फडणवीसांवर जरांगे-पाटील यांनी केलेले आरोप खोटे आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत फडणवीस यांची भूमिका मोलाची आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी, फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसलो होतो.
- आम्ही विशेष अधिवेशन बोलावून या समाजाला १० टक्के आरक्षण दिले. त्यात फडणवीस यांची भूमिका मोलाची होती. आम्ही दिलेल्या या आरक्षणास विरोध करण्यासाठी न्यायालयात कोण गेले आहे ते अगोदर पाहावे, त्यात विरोधी पक्षाचाच हात आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
जरांगेंच्या आरोपात तथ्य : पटोले
जरांगे-पाटील यांच्या फडणवीसांवरील आरोपात तथ्य आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, तेव्हा त्याविरुद्ध फडणवीसांचेच निकटवर्ती न्यायालयात गेले होते. तत्कालीन महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आरक्षणप्रश्नी बाजू न मांडण्यास आपल्याला फडणवीस यांनी सांगितल्याचे म्हटले होते, अशा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.