आम्ही RSSचं स्वागत आणि अभिनंदन करतो, कारण...; औरंगजेब वादाविषयी जितेंद्र आव्हाडांनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:15 IST2025-03-19T16:14:56+5:302025-03-19T16:15:53+5:30
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरएसएसचं अभिनंदन केलं आहे.

आम्ही RSSचं स्वागत आणि अभिनंदन करतो, कारण...; औरंगजेब वादाविषयी जितेंद्र आव्हाडांनी मांडली भूमिका
NCP Jitendra Awhad: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हा मुद्दा राजकीय चर्चेचा केंद्रस्थानी आला आहे. या मुद्द्यावरून नुकताच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात हिंसाचारही उफाळून आला. अशातच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी औरंगजेबाची कबर हा मुद्दा प्रासंगिक नसल्याचं सांगितल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आरएसएसने मांडलेल्या या भूमिकेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरएसएसचं अभिनंदन केलं आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आरएसएसने मांडलेल्या या भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. हीच भूमिका आम्ही मांडली असती तर टीका करणाऱ्यांची रांग लागली असती आणि औरंगजेब आमचा बाप असल्याचं त्यांनी सांगितलं असतं. पण महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला इथंच गाडला हे आमच्या छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणींच्या शौर्याचं प्रतिक आहे," असं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, मी आरएसएसचा कट्टर विरोधक असलो तरी औरंगजेबाचा मुद्दा सद्यस्थितीत प्रासंगिक नसल्याच्या त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आरएएस प्रवक्त्यांनी नेमकं काय म्हटलं?
औरंगजेब कबर वादाविषयी बोलताना आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर म्हणाले, "कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाज स्वास्थासाठी चांगला नाही. मला वाटतं की, पोलिसांकडून याची दखल घेतली जात आहे. ते याच्या मुळाशी जातील. औरंगजेब सध्याच्या स्थितीशी सुसंगत नाही", असं उत्तर आंबेकर यांनी दिलं. बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा २१ ते २३ मार्च दरम्यान होत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही सभा होत आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी संघाची पत्रकार परिषद झाली. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आंबेकर यांनी ही भूमिका मांडली आहे.