जो निर्णय राज्यपालांनी घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 09:06 PM2020-04-30T21:06:49+5:302020-04-30T21:53:13+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोनाच्या संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, संविधानाच्या तत्वांचे पालन करीतच राज्यपालांनी हा निर्णय आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारशीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो. याशिवाय, यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे.
विधान परिषदेच्या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी एप्रिल महिन्यातच निवडणूक होणार होती. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. आता राज्य सरकारकडून ही निवडणुक पुन्हा घ्यावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना पत्र शिवसेनेकडून देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधीमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी विधान परिषदेवर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर तातडीने कार्यवाही करावी, अशा विनंतीचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे.