बांधावर फिरून आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: October 29, 2022 02:24 PM2022-10-29T14:24:05+5:302022-10-29T14:25:09+5:30
आदित्य व उद्धव ठाकरेंना लगावला टोला
नंदुरबार: शेतकऱ्यांच्या हिताचे जे जे निर्णय शक्य ते सर्व निर्णय राज्य शासनाने घेतले असून अगदी कालपर्यंत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने मदत जाहीर केली आहे. असे असतांनाही काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर फिरून आरोप करीत आहेत. त्यांनी त्यांचे काम करावे असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे लगावला.
कुणी कितीही आरोप करो, सरकार आपले काम करीत राहील व लोकांना न्याय देईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे बोलतांना केेले.नंदुरबार नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, २०१९ मध्ये युतीचे सरकार यायला पाहिजे होते, लोकांनी कल दिला, पण तसे झाले नाही. मात्र खऱ्या अर्थाने तीन महिन्यापूर्वी युतीचे सरकार सत्तेवर आले असून हे सरकार जनतेचे आहे, सर्वसामान्यांचे आहे, शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळेच आपण ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तेथे आपल्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रेम मिळत आहे, असे ते म्हणाले.
नंदुरबार नगरपालिकेच्या इमारतीसाठी शासनाकडे बाकी असलेली सात कोटी २८ लाख रुपयांची रक्कम प्रास्ताविकात चंद्रकांत रघुवंशी यांनी मागणी करताच त्यांनी तेंव्हाच दूरध्वनीने नगरविकास विभागाला कळविले व त्यांचे भाषण सुरू होईपर्यंत त्याबाबतचा आदेशही शासनाने काढल्याचे जाहीर करून आपले सरकार आणि प्रशासनही गतीमान आहे याचा दाखला त्यांनी दिला. आपल्या भाषणातच त्यांनी शनिवार असतांनाही प्रशासनाने हा आदेश काढला आहे. त्यामुळे केवळ आश्वासने देणे, चालढकल करणे याववर आपला विश्वास नाही. जे आहे ते तात्काळ करावे हेच आपले धोरण असल्याने तीन महिन्यात आपण महाराष्ट्रातील लोकहिताचे अनेक अध्यादेश काढून जनतेला न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.