अयोध्येत बुद्ध विहार उभारणार, योगी आदित्यनाथांना भेटून जागा मिळवणारः रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 12:46 PM2020-07-31T12:46:58+5:302020-07-31T12:47:53+5:30
येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. त्यावरून, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर बाण सोडत आहेत.
‘भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी होते. अयोध्येत राम मंदिराच्या पूर्वीपासून बुद्ध विहार होते. अयोध्येतील मंदिर-मशिदीचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मार्गी लागला आहे. त्यामुळे आता अयोध्येत बुद्ध विहार उभारू, त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटून जागा मिळवू’, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईंचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नुकतीच अयोध्येत महाबुद्धविहार बांधण्याची मागणी केली होती. तोच धागा पकडून आठवले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे. अयोध्येत राम मंदिर, मशीद आणि बुद्ध विहार उभारून या सर्वधर्मसमभावाचं दर्शन जगाला घडवावं’, असं आवाहनही आठवले यांनी केलं आहे.
येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. त्यावरून, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर बाण सोडत आहेत. कोरोना संकटात हे भूमिपूजन करावं का, यावरून मतमतांतरं आहेत. राम मंदिरामुळे कोरोना बरा होणार आहे का?, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलीय; तर कोरोना संकट लक्षात घेऊन या राम मंदिराचं ई-भूमिपूजन करावं, अशी सूचना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्यावरून, भाजपाने त्यांना लक्ष्य केलं आहे.
राम मंदिर भूमिपूजनावरून हे राजकारण तापलं असतानाच, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी महाबुद्धविहाराचा विषय पुढे आणला आहे. अयोध्येतील उत्खननात बुद्धाच्या मूर्ती आणि बौद्ध परंपरेशी नातं सांगणारं अवशेष सापडले आहेत. ऑल इंडिया मिली कौन्सिलनेही त्या ठिकाणी साकेत नगरी असल्याचं मान्य केलं आहे. उत्खननामध्ये सापडलेल्या प्राचीन अवशेषांचे जतन करण्यासाठी अयोध्येत मोठं संग्रहालय आणि महाबुद्धविहार झालं पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी सर्व बौद्ध नेत्यांनी गटतट विसरून एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
या संदर्भात बोलताना रामदास आठवले म्हणाले की, अयोध्येत बुद्ध विहार उभारावे, ही आमची गेल्या १० वर्षांपासूनची मागणी आहे. अयोध्येत आता राम मंदिर उभं राहणार आहे आणि मशिदीलाही स्वतंत्र जागा देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाचं आम्ही स्वागत केलं आहे. आता अयोध्येत भव्य बुद्धविहारासाठी जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी योगी आदित्यनाथ यांची भेटही आपण घेणार आहोत. देशभरातील बौद्ध जनतेचे सहकार्य घेऊन एक ट्रस्ट तयार करून अयोध्येत भव्य बुद्ध विहार उभारण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केलं.
संबंधित बातम्याः
राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका
तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच
सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्टची घोषणा, अयोध्येत मशीद बांधणार
राम मंदिर भूमिपूजनाबाबत MIM सारखंच मत मुख्यमंत्र्यांनी मांडणं आश्चर्यकारक; देवेंद्र फडणवीसांचा चिमटा
'मोदींनी राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाला जाणं संविधानाच्या शपथेचं उल्लंघन'