''मनसेच्या भूमिकेत बदल झाल्यास युतीचा विचार करू''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 06:26 AM2020-01-10T06:26:42+5:302020-01-10T06:26:58+5:30

मनसे आणि भाजपच्या विचारात, कार्यपद्धतीत अंतर आहे.

We will consider the alliance if there is a change in the role of MNS | ''मनसेच्या भूमिकेत बदल झाल्यास युतीचा विचार करू''

''मनसेच्या भूमिकेत बदल झाल्यास युतीचा विचार करू''

Next

मुंबई : मनसे आणि भाजपच्या विचारात, कार्यपद्धतीत अंतर आहे. मात्र, भविष्यात मनसेच्या भूमिकेत बदल झाला, विचार व्यापक झाले, तर परिस्थितीनुसार युतीचा विचार होऊ शकतो. आज तरी तशी शक्यता नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य युतीच्या चर्चेवर खुलासा केला. मात्र, राज यांच्या भेटीबाबत ‘माझी गाडी तिथून बाहेर पडली, हे खरे आहे, पण त्यांच्या गाडीबाबत मला कल्पना नाही,’ असे सांगत फडणवीस-ठाकरे भेटीबाबत थेट उत्तर द्यायचे टाळल्याने गूढ आणखी वाढले.
दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सभागृह गुरुवारी राजकीय टोलेबाजी आणि मिश्कील शेरेबाजीने न्हाऊन निघाले. निमित्त होते बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच आॅफ द ईअर पुरस्कारांचे. या मानाच्या पुरस्कार वितरणास राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक, महिला व बालविकास कल्याणमंत्री यशोमती ठाकूर, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष ई.पी. ढाकणे, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा, लोकमतचे संपादकीय आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, बीकेटी टायर्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार आणि लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते. त्याचबरोबर ‘धुरळा’ या चित्रपटातील कलाकार अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ यांच्यासह झी स्टुडिओचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.
राजकीय नेत्यांकडून होणारी टोलेबाजी आणि त्याला रसिकांकडून मिळणारी दाद यामुळे कार्यक्रम रंगतच गेला. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते व्यासपीठावर होते. विविध विषयांवर ठामपणे आपली भूमिका मांडतानाच एकमेकांना चिमटा काढण्याची संधीही नेत्यांनी साधली. राज ठाकरे यांच्याशी आमच्या भेटी अनेक वेळा झाल्या आहेत. मनसे व भाजप एकत्र येण्याची आज तरी चिन्हे नाहीत. मनसे व भाजपच्या विचारात, कार्यपद्धतीत अंतर आहे. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे. दृष्टिकोनही व्यापक आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागते. भविष्यात मनसेच्या भूमिकेत बदल झाला, तर काहीही होऊ शकते. पण आजतरी तशी शक्यता दिसत नाही.
अशा गुपचूप झालेल्या भेटींतून फारसे चांगले घडत नाही, असा टोला लगावून मंत्री नवाब मलिक म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भेटीबाबत फडणवीस स्पष्टपणे काही बोलत नाहीत. मागे नारायण राणे यांची अहमदाबादला त्यांनी अशीच भेट घेतली होती. त्यांचे पुढे काय झाले ते सगळ्यांना माहीत आहे. गुपचूप भेटीत वाईटच घडते, असा टोला मलिक यांनी लगावला.


महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये सध्या खुर्चीवरूनही वाद होत आहेत. यावर तरुण आमदारांना काय वाटते या प्रश्नावर, मोठ्या नेत्यांबाबत विचारून, आम्हाला का अडचणीत आणता, असे उत्तर राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी देताच सभागृहात हशा पिकला.
राजकीय नेते आणि मराठी सिने तारेतारकांसोबतच राज्याच्या विविध जिल्ह्यातील सरपंच सोहळ्याला उपस्थित होते. कोण होणार सरपंच आॅफ द ईअर या उत्सुकतेने गावागावातील जाणकारही सरपंचांच्यासह मुंबईत दाखल झाले होते.
मुस्लिम समाजास पाच टक्के आरक्षण देणे गरजेचे - नवाब मलिक
मुस्लिम समाजाचे मागासलेपण बघता त्यांना शिक्षण आणि नोकरीत पाच टक्के आरक्षण देणे गरजेचे आहे. पण फडणवीस सरकारने दिले नाही. शिवाय नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू होऊ नये, ही आमची भूमिका आहे. केंद्राने मंजूर केलेल्या सीएए कायद्यास संसदेतही आम्ही विरोध केला होता. माणसाला नागरिकत्व द्यायचा अधिकार आहे. मात्र धर्माच्या आधाराव नागरिकत्व देण्याचा कायदा असल्याने समाजात दुफळी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कारणात्सव एनआरसी राज्यात लागू होणार नाही, असे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. राज्यात कुठल्याही धर्मीयांच्या मनात भीती राहणार नाही, या दृष्टीने आम्ही काम करू, असेही त्यांनी सांगितले.

>मुश्रीफ म्हणाले... ‘ती’ मेगाभरती आम्ही करू
फडणवीस सरकारची न झालेली मेगाभरती महाविकास आघाडी सरकार काळात मात्र नक्कीच केली जाईल. फडणवीस सरकारच्या काळात मेट्रोसारख्या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झाले. आमचा फोकस मात्र ग्रामीण भागातील विकासाकडे असणार आहे. थेट सरपंच निवडीची पद्धत बंद करतानाच एक गाव एक ग्रामसेवक या तत्त्वावर कामकाज चालेल यावर आमचा भर राहील. त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती केली जाईल, असे आश्वासनही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या वेळी दिले.

Web Title: We will consider the alliance if there is a change in the role of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.