मित्र सोबत आले तर ठीक, अन्यथा विरोधकांसह त्यांच्यावरही मात करू- अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 08:20 PM2019-01-06T20:20:11+5:302019-01-06T20:22:54+5:30
भाजपाचे अध्यक्ष अमित शहांचा शिवसेनेला सूचक इशारा
लातूर : २०१४ पेक्षा २०१९ चा विजय मोठा असेल. कार्यकर्त्यांनी ४८ पैकी ४० जागा जिंकण्याची तयारी ठेवावी, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेसाठी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही स्वबळाचे संकेत दिले. मित्र पक्ष सोबत आले तर ठीक, अन्यथा विरोधकांसह त्यांचाही पराभव करू, असं शहा म्हणाले. २०१४ मध्ये युती नव्हती, तरीही फडणवीस मुख्यमंत्री झाले, याचीही आठवण त्यांनी करून दिली.
लातुरात रविवारी बूथ व शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, विजयासाठी दोन कोटी मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा अधिक सरकारचे लाभार्थी आहेत. त्यामुळे ४० जागा जिंकण्याच्या तयारीला लागा. भाजपाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कार्यकर्ता आहे. संघटना हीच ताकद आहे. युती होईल की नाही, हे अध्यक्ष ठरवतील. २०१४ साली ‘अबकी बार-मोदी सरकार’ हा नारा होता. आता ‘फिर एकबार - मोदी सरकार’ हा नारा आहे. येणारा विजय मोठा असेल. स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा. एकहाती सत्ता मिळवायची असेल तर दोन कोटी मते लागतील. त्यापेक्षा अधिक लोकांपर्यंत आपण योजना पोहोचवल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक घरांपर्यंत गॅस पोहोचवला. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, भाजपाच्या कामाचा आधार हा संघटन असून, पक्षाचे ११ कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. मीही १९८२ मध्ये बूथ अध्यक्ष होतो. २०१४ मध्ये आपल्याकडे सहा राज्ये होती. आज १६ राज्यांमध्ये भाजपा आहे. २०१९ मध्ये ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपाची सत्ता येईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे म्हणत शहांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने देशाला गुलामीतून मुक्तता मिळाली. पानिपतची लढाई आपण जिंकलो असतो तर इंग्रजांनी भारतात राज्य केले नसते. पानिपतची जशी लढाई होती, तशी २०१९ ची लढाई देशासाठी आहे. गठबंधन कोणाचेही होवो, विजय भाजपाचाच आहे. काँग्रेसच्या काळामध्ये ५५ वर्षांत त्यांनी कोणताही विकास झाला नाही. एक कोटी लोकांना घरे नव्हती. मोदी सरकारने बँक खाते नसलेल्यांना बँकेशी जोडले. सौभाग्य योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक योजना सामान्यांसाठी दिल्या. महाराष्ट्रात ३० हजार गरिबांना घरे मिळणार आहेत, असे शहा म्हणाले.
काँग्रेसच्या काळात परदेशातून घुसखोरी होती. उरीमध्ये दहशतवादी हल्ले झाले. भाजपा सरकारने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, असेही शहा म्हणाले. तसेच यावेळी शहा यांनी गॅस कोणी दिला, शौचालय कोणी दिले हे घरोघरी जाऊन सांगा. आजच्या सारखे १०० मेळावे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील तसेच चारही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
राफेलमध्ये ५० पैशांचादेखील घोटाळा नाही
राहुल गांधींवर टीका करताना अमित शहा म्हणाले, तुमचे चरित्र बघा, नंतर दुसऱ्यांवर आरोप करा. राफेलमध्ये ५० पैशांचाही घोटाळा नाही. उलट आई आणि मुलगा दोघेही जामिनावर बाहेर आहेत. ते खोटे बोलत आहेत. नांदेडवाले पण आदर्शमध्ये सुप्रीम कोर्टात येतील.
बॅनर गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्राविना
नांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद अर्थात मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा लातूरला झाला. परंतु, मराठवाड्यातील दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्राविनाच शहरातील बॅनर आणि होर्डिंग्ज झळकत होते. मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी दबक्या आवाजात याबद्दल नाराजी व्यक्त केली.