वीस वर्षात झाले नाही ते करतो आहोत :देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 07:10 PM2018-11-01T19:10:59+5:302018-11-01T19:12:48+5:30
जे 20 वर्ष आधी व्हायला हवे होते ते आता आम्ही करतो आहोत. पुणे एक वैभवशाली शहर व्हावे असा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे: जे 20 वर्ष आधी व्हायला हवे होते ते आता आम्ही करतो आहोत. पुणे एक वैभवशाली शहर व्हावे असा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी संध्याकाळी झाले.
मुख्यमंत्री म्हणाले, गेली अनेक वर्ष गाजतो आहे या रस्त्याचा प्रश्न. अडथळे आणले जात होते. पुणे हे मुंबई नंतरचे महत्वाचे शहर आहे. म्हणूनच आम्ही इथे मेट्रो आणली. पुण्यात नवे विस्तारित मार्ग होत आहेत. स्वारगेटमध्ये हब तयार करतो आहोत. 20 वर्ष फक्त विकासाची चर्चाचं व्हायची अशा सर्व गोष्टींना आम्ही मान्यता दिली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर मुक्ता टिळक, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.
प्रास्तविकात महापौर म्हणाल्या, अपघात कमी होण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्याच्या कामाची निविदा काढली. त्यावर आक्षेप घेतले गेले. तीन वेळा निविदा काढली व नंतरच काम दिले. सर्व द्रुष्टीने रस्ता वैशिष्ट्यपूर्ण केला आहे. सर्वांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न आमचा असतानाही काहींनी त्याचे भूमीपूजन केले. स्थानिक आमदार टिळेकर म्हणाले, १९९७ साली आमच्या गावाचा महापालिकेत समावेश झाला. पण 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी यांनी काही केले.नाही. रस्ता होऊच नये असा त्यांचा प्रयत्न होता. जीव गेले अनेक. पण काम नाही, फरक नाही. भाजपाची सत्ता आली व रस्त्याच्या कामाला मान्यता दिली. शिवसेनेने रस्त्याचे आदल्यादिवशी भूमीपूजन केले. त्याचा आमदार टिळेकर व महापौर टिळक यांनी केविलवाणा प्रयत्न असा ऊल्लेख केला.
विद्यार्थी आभार मानण्यासाठी आल्याचा आमदारांचा दावा : भूमीपूजन कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांना गणवेशात उपस्थित ठेवण्यात आले होते. रस्ता अरूंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. काम सुरू केले त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी विद्यार्थी आल्याचे आमदार टिळेकर यांनी सांगितले.
नगरसेविकांना पण हवा फोटो : कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी सर्व महिला नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या मागे रांगेत ऊभ्या राहिल्या. फोटोग्राफरला त्या पटकन फोटो काढ म्हणून खुणावत होत्या. मुख्यमंत्र्यांच्याही ते लक्षात आले व त्यांनी मागे पाहून हसून त्यांना दाद दिली.