सरकारचा 'हा' डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, रोहित पवारांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:54 PM2023-12-16T12:54:07+5:302023-12-16T12:55:36+5:30
रोहित पवार यांनी यासंदर्भात एक्सवर एका व्हिडिओसोबत पोस्ट केली आहे.
मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने गेल्या दहा वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी चित्ररथ गावोगावी फिरवण्यात येत आहे. यासंदर्भात कोल्हापूर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तळागाळातल्या समाजघटकातील मुलांनी शिकूच नये यासाठी ‘समूह शाळा योजने’च्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला नसावा ना? अशी शंका येते. पण सरकारचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
रोहित पवार यांनी यासंदर्भात एक्सवर एका व्हिडिओसोबत पोस्ट केली आहे. केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती देण्यासाठी सध्या गावोगावी भाजपाचे चित्ररथ फिरत आहेत. राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली या गावात जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर एका युवकाने प्रश्नांची सरबत्ती केली. देशात भारत सरकार आहे की मोदी सरकार, हे एका व्यक्तीचे सरकार आहे? असा सवाल त्याने केला. विशेष म्हणजे, त्याच्या या सरबत्तीमध्ये गावकऱ्यांनी हस्तक्षेप न करता मूकसंमतीच दिली असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
ग्रामीण भागातल्या पोरांना जेंव्हा शिक्षण मिळतं तेंव्हा ते आपल्या हक्क-अधिकारांबाबत, संविधानाबाबत न घाबरता बेडरपणे बोलतात, त्याचाच पुरावा म्हणजे हा व्हिडिओ… आणि याचीच भाजपला कदाचित भीती वाटत असावी.. म्हणून तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील तळागाळातल्या समाजघटकातील मुलांनी शिकूच नये… pic.twitter.com/t4K1a7jDJ8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 15, 2023
ग्रामीण भागातील पोरांना जेव्हा शिक्षण मिळते, तेव्हा ते आपल्या हक्क-अधिकारांबाबत, संविधानाबाबत न घाबरता बेडरपणे बोलतात, त्याचाच पुरावा म्हणजे हा व्हिडिओ असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. याचीच भाजपाला कदाचित भीती वाटत असावी म्हणून तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील तळागाळातल्या समाजघटकातील मुलांनी शिकूच नये यासाठी ‘समूह शाळा योजने’च्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला नसावा ना? अशी शंका येते. पण सरकारचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळांचे समूह शाळांत रूपांतर करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात विधान परिषदेत आमदार अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. असा निर्णय झाल्यास 14 हजार शाळा बंद होऊन 1 लाख 85 हजार 767 विद्यार्थी आणि 29 हजार 707 शिक्षकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.