'विदर्भातले असलो तरी, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 05:18 PM2018-12-23T17:18:31+5:302018-12-23T17:19:38+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं पश्चिम महाराष्ट्राला आश्वासन
सातारा : मुख्यमंत्री आणि मी विदर्भातील असल्याने पश्चिम महाराष्ट्रावर विकासकामांमध्ये अन्याय होतो. मात्र हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. आम्ही विदर्भवाले पश्चिम महाराष्ट्रावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. सध्या सर्वात जास्त विकासकामे पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहेत,’ असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जलसंपदा विभागातर्फे येथे आयोजित केलेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
१९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर महाबळेश्वर येथे पहिली बैठक ठेवली होती. या बैठकीला मी आणि माझे सहकारी जायला निघालो, तेव्हा खंबाटकी घाटात टँकर उलटला होता. त्यामुळे तब्बल चार तास आम्हाला त्या घाटात अडकून पडावे लागले. महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेतली. या भागात बोगदा काढण्याचा प्रस्ताव मी या बैठकीत ठेवला होता. यासाठी मोठा खर्च होणार होता. तेव्हा एका बोगद्याचे काम केले. या घाटात दुहेरी वाहतुकीची व्यवस्था झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला, अशी आठवण गडकरींनी सांगितली.
संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे चित्र डोळ्यांपुढे ठेवून आम्ही कामे करत आहोत. गेल्या चार वर्षांत ५ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्ट्रात सुरू केली आहेत. या कामांमध्ये अजिबात भ्रष्टाचार झालेला नाही. कंत्राटदाराने कुठल्याही कामासाठी मंत्री म्हणून मला भेटायची गरज नाही. रस्त्यांच्या कामांसोबतच जलसंवर्धनाचीही कामे सुरू आहेत. वाशीम, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांत सिंचनाबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. तो आता सातारा जिल्ह्यातही वापरण्यात यावा. नद्या-ओढ्यांचे खोलीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.
आम्ही विदर्भाचे म्हणून पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करतो, असे म्हणणे कसे चुकीचे आहे, ते आम्ही दाखवून दिले आहे. पूर्वी जितकी कामे झाले नाहीत, तितकी कामे मोदी-फडणवीस सरकारांच्या काळात करून दाखवली आहेत. साखरेचे भरमसाठ उत्पन्न होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. ते सोडवण्यासाठी आता सरकार मध्यस्थी करणार नाही. साखरेचे उत्पादन बंद करून कारखान्यांनी हवी तेवढी इथेनॉल निर्मिती करावी, हे सर्व इथेनॉल ५५ रुपये लिटर दराने पेट्रोलियम मंत्रालय खरेदी करायला तयार आहे. वाहनांनाही आता १०० टक्के इथेनॉल वापरता येईल. त्यामुळे कारखान्यांनी वेळीच बदलावे, अन्यथा साखर कारखानदारी संपल्याशिवाय राहणार नाही, अशी भविष्यवाणीही गडकरी यांनी केली.
यावेळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचे भूमिपूजन व धोम-बलकवडी धरणाच्या कालव्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा माधवी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.