आम्ही भाजपा-सेनेसोबत जाणार नाही - तटकरे
By admin | Published: March 3, 2017 06:05 AM2017-03-03T06:05:01+5:302017-03-03T06:05:01+5:30
आमचे शिवसेना आणि भाजपाशी कोणतेही अंडरस्टँडिंग नव्हते.
मुंबई : आमचे शिवसेना आणि भाजपाशी कोणतेही अंडरस्टँडिंग नव्हते. शिवाय, आमच्यात कोठेही मैत्रीपूर्ण लढतही झाली नाही. आमची भूमिका आम्ही निवडणुकीआधीच स्पष्ट केली होती व ती आम्ही पाळली, पण काँग्रेसने उस्मानाबाद, रायगडमध्ये शिवसेनेशी हातमिळवणी केली. आजही भाजपा-सेनेसोबत जाण्याचा कोणताही विचार आमच्यात नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
शिवसेना युतीमधून बाहेर पडली आणि सत्ता सोडून देईल याची कोणतीही आशा आपल्याला नाही, उलट आपण त्याच दिवसाची वाट पाहत आहोत, मात्र सेनेला सत्तेचा मोह सुटत नाही, असेही तटकरे या वेळी म्हणाले. भाजपा-शिवसेनेची युती होईल, यावर आपला विश्वास आहे, कारण आता तरी निवडणुकांची कोणतीही शक्यता वाटत नाही, असेही तटकरे पुन्हा म्हणाले. खिशात राजीनामे आहेत असे दाखवणाऱ्यांच्या राजीनाम्यावरची शाई उडून गेली असेल किंवा एवढे दिवस राजीनामे खिशात ठेवले की फाटून जातात, असा टोलाही तटकरे यांनी लगावला. फक्त ‘सामना’मधून भाजपाच्या विरोधात लिखाण करून काही होत नाही, त्यासाठी पाठिंबा काढून घेण्याची हिंमत दाखवावी लागते. अविश्वास ठराव आणण्याची गोष्ट काँग्रेसमधून कोणी सुरू केली याची माहिती आपल्याला नाही. याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही तटकरे या वेळी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)