उद्धव ठाकरेंनी सोबत यावं, म्हणून आता त्यांच्या दारात जाणार नाही; यायचं असेल तर..., रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 02:50 PM2022-08-07T14:50:11+5:302022-08-07T14:50:42+5:30
"ज्या युतीला राज्यातील लोकांनी मतदान केले होते. त्याच्यासोबत दगाफटका करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संधान साधले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले."
उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे की न यावे, हे बोलण्यासाठी काही आम्ही आता त्यांच्या दारात जाणार नाही. यायचे असेल, कुणीही येणार असेल, त्यांना मागच्या घटनेचा पश्चात्ताप झाला असेल, तर त्यांना यायला काही हरकत नाही. त्यांना येण्यासाठी आमची ना नाही. या आणि आमच्यासोबत राहा. पण जे सरकार आमचे चाललेय, त्यात डिस्टर्ब करू नका, असे भाजपचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हणटले आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते.
राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही -
यावेळी, मैत्रिदिनाच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नाही आणि कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नाही. उद्धव ठाकरे काही दिवस आमच्यासोबत होते. 25 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. मात्र, 25 व्या वर्षी त्यांना वाटले, की भारतीय जनता पक्षासोबत राहून आपले नुकसान झाले. यामुळे त्यांनी आमची साथ सोडली. ज्या युतीला राज्यातील लोकांनी मतदान केले होते. त्याच्यासोबत दगाफटका करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संधान साधले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. ते आमचे मित्र होते. आता पूर्व मित्र झाले.
तसेच, आता आम्ही नवीन मित्र जोडले आहेत, एकनाथ शिंदे. ते आज आमचे मित्र आहेत. मित्र, म्हणजेच मूळ शिवसेना आहे आणि आता आम्ही एकत्र सरकार स्थापन केले आहे. यामुळे, मैत्री दिनाच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देताना अशाच शब्दांचा वापर करायला हवा. की समोरच्याला वाईट वाटू नये. असाच शब्द प्रयोग कुण्या एखाद्या शिंदे गटातील आमदाराने केला असले, तर त्याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही दानवे यांनी म्हटले आहे. ते टीव्ही-9 सोबत बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावे -
तत्पूर्वी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. शिवसेना वाढवावी ही भावना प्रत्येक शिवसैनिकांची, पदाधिकारी आणि आमदार-खासदारांची आहे. भगवंताच्या आशीर्वादाने हे घडून येईल,असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले होते.