Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनोज जरांगेंना दाद, म्हणाले, "भारी मुलगा, समाजासाठी लढतोय"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:39 AM2023-09-14T11:39:12+5:302023-09-14T12:26:53+5:30
Eknath Shinde : "मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर अखेर १७व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेतलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संदीपान भुमरे, राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांचीदेखील उपस्थिती होती. शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक केलं आहे.
"मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं. आपली भूमिका मी अगदी स्पष्टपणे मांडली आहे, उपोषण सोडलं त्याबद्दल आभारी आहे असंही शिंदेंनी सांगितलं.
जालना येथे उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेट https://t.co/7Q1gW9aKAf
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 14, 2023
"तुमचा मुलगा भारी आहे, स्वत: साठी नाही तर समाजासाठी लढतोय हे मी मनोजच्या वडिलांना सांगितलं. जेव्हा जेव्हा मला मनोज भेटला तेव्हा त्याने मराठा आरक्षणाबद्दलच चर्चा केली. मनोजला मनापासून शुभेच्छा आणि त्याचं मनापासून अभिनंदन करतो, आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं ते जिद्दीने पुढे नेणं आणि त्याला महाराष्ट्रात जनतेचा प्रतिसाद मिळतो हे फार कमी वेळी पाहायला मिळतं. ज्याचा हेतू शुद्ध असतो त्याच्यामागे जनता पाहायला मिळते."
"पहिल्या दिवसापासून सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. शासनाची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वी सरकारने मराठा समाजाला 16 आणि 17 टक्के आरक्षण दिलं होतं. पण सुप्रीम कोर्टात ते आरक्षण दुर्दैवाने रद्द झालं. आपल्याला मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. लाठीचार्जची घटना दुर्दैवी आहे. मराठा समाज अत्यंत शिस्तप्रिय आहे. शांतता बिघडेल असं तुम्ही कधी काम केलं नाही. मराठा समाजाकडून अनेक जण शिकले" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे #मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी भेट घेऊन चर्चा केली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय… pic.twitter.com/iVVMoXLrm0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 14, 2023