"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 02:41 PM2024-11-16T14:41:29+5:302024-11-16T14:43:07+5:30
उद्धव ठाकरेंनी सिल्लोड मतदारसंघात प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले.
श्यामकुमार पुरे,सिल्लोड
Maharashtra Assembl Election 2024: सिल्लोड येथील जाहीर सभेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून हल्ला केला. या प्रचारसभेनंतर माध्यमांशी बोलतांना अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. 'मला काय पाडता, मीच सारा कार्यकर्त्यांचा फौज फाटा घेऊन संभाजीनगर जिल्ह्यात उबाठाचा बिस्मिला करणार आहे. त्यांच्या पक्षाचा एकही आमदार आता निवडून येणार नाही. उबाठाचा सुपडा साफ करणार आहे. मला काय जेल मध्ये टाकता उद्धव ठाकरे यांच्या अजून ४ चौकशा बाकी आहेत. युतीचे सरकार आल्यावर आम्हीच त्यांना जेलमध्ये टाकू', असा इशारा अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
"उद्धव ठाकरे यांची सरकार उलथून टाकण्यात व मुख्यमंत्री बदलण्याच्या भूमिकेत माझी प्रमुख भूमिका होती. त्यामुळे ठाकरे यांचा थयथयाट होत आहे. भाजप शिवसेनेचा दुश्मन आहे आणि मला पाडण्यासाठी तुम्ही भाजपाचे पाया पडताय. भाजपच्या मतांची भीक मागताय', असा सनसनाटी पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केले होते.
"तुमचे आमचे (भाजप-उद्धवसेना) मतभेद आहेत. त्याच्यासाठी कुणी माझ्याशी बोलायला तयार असाल, तर मी बोलायला तयार आहे. पण, आता आपण सर्व मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकू. या सिल्लोडची दहशत गुंडा गर्दी दूर करण्यासाठी सुरेश बनकर यांना निवडून द्या व गद्दार सत्तार यांना पाडा, नव्हे तर गाडा", असे वक्तव्य केले होते.
मोदींना शिव्या देतात अन् भाजपची मदत मागताय..
"२०१९ मध्ये त्यांना माझी दहशत, दादागिरी दिसली नाही का? मी दहशत माजवतो. लांडा बाडा आहे, याची अक्कल तेव्हा नव्हती का? तेव्हा माझी आरती करत होते? एका मंचावर मोदींना आणि भाजपला शिव्या देता आणि त्याच मंचावर सत्तारला गाडण्यासाठी भाजपला मदत करा, असे आवाहन करता हे कोणते राजकारण आहे? त्यांना डोक्याच्या डॉक्टरला दाखवावे लागेल", असा टोला अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
"दानवे माझ्या सोबत आहेत"
उद्धव ठाकरे व उद्धवसेनेचा उमेदवार घाबरला आहे. म्हणून भाजपला मतांची भीक मागत आहे. मी युतीचा उमेदवार आहे. भाजप आणि दानवे माझ्या सोबत आहे
उद्धव ठाकरे यांना सिल्लोडमधून काही मिळणार नाही. पण, याचा फटका त्यांच्या जिल्ह्यातील उमेदवारांना बसेल जिल्ह्यात उबाठाचा सुपडा साफ होईल", असा इशारा अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिला.
"मुख्यमंत्री पदावरून घरी बसवले म्हणून जलसी"
"एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव करून आम्ही त्यांना दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदावरून घरी बसवले. जनतेच्या मनातील काम करणारा, लोकांना भेटणारा, विकासाला गती देणारा मुख्यमंत्री आम्ही खुर्चीवर बसवला याची जलसी असल्याने ठाकरे माझ्यावर असे आरोप करत आहेत, पण मला काही फरक पडत नाही जनता याचे उत्तर मतपेटीतून देईल", असे उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिले.