शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवू, हातपाय तोडू; बच्चू कडुंचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 09:25 PM2023-09-27T21:25:03+5:302023-09-27T21:25:25+5:30
भंडाऱ्यातील एका मोर्चामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. याचे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही काळापासून शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार न केल्याने नाराज असलेले आमदार बच्चू कडूंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांना तुडविल्याशिवाय, हात पाय तोडल्याशिवाय गप्प बसणार नसल्याची धमकी कडू यांनी दिली आहे.
भंडाऱ्यातील एका मोर्चामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. याचे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मी ३५० आंदोलने केली आहेत. त्यात माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आमदार असलो तरी मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. ही सभा कडुलिंबाच्या झाडाखाली होत आहे आणि मी पण कडू आहे, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असे कडू म्हणाले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचे त्यांनी सांगितले असून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, असे कडू म्हणाले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना वन विभागाने नुकसान भरपाई दिलेली नाही. याविरोधात प्रहार संघटनेने पवनी येथे हे आंदोलन केले होते. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
यावेळी कडू यांनी नाना पटोले यांचाही समाचार घेतला. मोदी यांच्यावर सुपर आतंकवादी असल्याची टीका पटोले यांनी भंडाऱ्यात केली होती. इतक्या खालच्या स्तरावरची टीका करू नये, असा सल्ला कडू यांनी देताना दहशतवाद्याची व्याख्या नाना पटोले यांना माहीत नसेल, त्यांनी समजून घ्यावी असा टोला कडू यांनी लगावला.