नाराज वडेट्टीवारांसाठी भाजपाने उघडलंय दार; पहिला धक्का देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 01:20 PM2020-01-07T13:20:42+5:302020-01-07T13:41:50+5:30

दुय्यम खाती मिळाल्यानं नाराज झालेल्या वडेट्टीवारांसाठी भाजपाची मोर्चेबांधणी

we will welcome you bjp gives offer to congress leader vijay wadettiwar who is unhappy with portfolio | नाराज वडेट्टीवारांसाठी भाजपाने उघडलंय दार; पहिला धक्का देणार?

नाराज वडेट्टीवारांसाठी भाजपाने उघडलंय दार; पहिला धक्का देणार?

Next

नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपावर नाराज असलेल्या मंत्र्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपानं सुरू केल्याचं दिसत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार दुय्यम खातं मिळाल्यानं प्रचंड नाराज आहेत. ते धक्कादायक निर्णय घेणार असल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांना पक्षात घेण्यासाठी भाजपानं हालचाली सुरू केल्या आहेत. माजी मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी वडेट्टीवारांनी योग्य निर्णय घ्यावा. त्यांचं भाजपामध्ये स्वागतच आहे, असं म्हणत थेट पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारनं खातेवाटपात विदर्भावर अन्याय केल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. 'विजय वडेट्टीवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं आहे. मात्र इतक्या महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या नेत्याला दुय्यम खाती देऊन त्यांचं मनोधैर्य खचवण्यात येत आहे. वडेट्टीवारांना महत्त्वाचं खातं द्यायला हवं होतं. दुय्यम दर्जाचं खातं देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. आता त्यांनी योग्य निर्णय घ्यायचा आहे. ते भाजपामध्ये आल्यास आम्ही त्यांचं स्वागतच करू,' असं बावनकुळे म्हणाले. 

विजय वडेट्टीवार आणि सुनिल केदार यांच्यावर अन्याय झाल्याची भावना विदर्भात आहे. अनेक वर्षांपासून निवडून आलेल्या या नेत्यांची पक्षानं दुय्यम खात्यांवर बोळवण केली, असं बावनकुळे यांनी म्हटलं. विदर्भाच्या विकासासाठी या भागातील मंत्र्यांना सिंचन, जलसंधारण, कृषी यासारखी खाती मिळायला हवी होती. आमच्या सरकारच्या काळात विदर्भाकडे गृह, अर्थ, वन, ऊर्जा यासारखी महत्त्वाची खाती होती. मात्र यातलं उर्जा सोडल्यास एकही खातं आता विदर्भाकडे नाही, असं बावनकुळे यांनी सांगितलं. 

वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत. मागील विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या एका ज्येष्ठ नेत्याला अशी दुय्यम खाती देण्यात आल्यानं विदर्भातील काही कॉंग्रेस नेते, कार्यकर्तेही नाराज आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: we will welcome you bjp gives offer to congress leader vijay wadettiwar who is unhappy with portfolio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.