"आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली तर...; अंबादास दानवेंसाठी शिंदे गटाकडून खुणवाखुणवी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 03:21 PM2024-03-27T15:21:52+5:302024-03-27T15:25:13+5:30
"आपण त्यांना ऑफर देणार का? असा प्रश्न विचारला असता, "आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल. आणि त्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील."
लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आज शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले. यांत संभाजीनगरच्या जागेचाही समावेश आहे. या जागेसाठी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन नेते उत्सुक आणि शर्यतीत होते. अखेर, या जागेसाठी अंबादास दानवे यांना डावलण्यात आले आणि चंद्रकांत खैरे यांच्यावर सलग सहाव्यांदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर आता, अंबादास दानवे यांच्या संदर्भात भाष्य करत, "आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल," अशी अप्रत्यक्ष ऑफरच शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी दानवे यांना दिली आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
शिरसाट म्हणाले, "आज चंद्रकांत खैरे यांची जी उमेदवारी जाहीर झाली, त्यांनाही जालना आणि बीडची जबाबदारी देण्यात आली होती. परंतू दानवेंना दिली नव्हती. म्हणजे विरोधीपक्षनेता आहे की केवळ नावाला आहे? बाहुल्यासारखा वापर करायचा. हे पक्षाने त्यांनी काय ठरवले असेल त्यांची भूमिका आहे. परंतु, निश्चितच दानवेंनी त्यांची भूमिका बदलली, तर त्यांना आम्ही निश्चितपणे सहकार्य करू. आता दानवे कुणाकडून उमेदवार राहतील? हा संभ्रम आहे."
यावेळी, आपण त्यांना ऑफर देणार का? असा प्रश्न विचारला असता, "आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल. आणि त्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील," असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
खैरे म्हणाले दानवे माझे शिष्य -
यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "दानवे हे माझे सहकारी आहेत. मी आधीच म्हटले होते की, ते माझे शिष्यही आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करू. यावेळी, दानवेंना भेटायला जाणार का? असे विचारले असता, खैरे म्हणाले, दानवेच मला भेटायला येतील, कारण आता सर्व येतील त्याप्रमाणे तेही येतील. आम्ही सर्वजण एकमेकांना भेटत असतो. शिवसेनेत तेवढ्यापुरतीच स्पर्धा असते. एकदा तिकीट मिळाल्यानंतर आम्ही काही बोलत नाही."