टोलनाक्यांवर हमरीतुमरी, रुग्णालयांचा असहकार
By admin | Published: November 10, 2016 06:31 AM2016-11-10T06:31:54+5:302016-11-10T06:31:54+5:30
चलनातून अचानक बाद केलेल्या १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास खारेगाव टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने तेथे बुधवारी सकाळी
ठाणे : चलनातून अचानक बाद केलेल्या १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास खारेगाव टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने तेथे बुधवारी सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. ठाणे रेल्वे स्थानक आणि शहरातील पेट्रोलपंपांवर याच नोटांमुळे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात खटके उडत होते. शहरातील अनेक खासगी रुग्णालये व डॉक्टर यांनी नोटा स्वीकारायला नकार दिल्याने रुग्ण व त्यांच्या नातलगांचे अतोनात हाल झाले.
खारेगाव, आनंदनगर व मुलुंड चेकनाक्यालगत असलेल्या टोलनाक्यांवर या नोटा घेण्यास नकार देण्यात आल्याने सकाळी कार्यालयाकडे निघालेले मोटारचालक आणि कर्मचारी यांचे खटके उडत होते. खारेगाव टोलनाक्यावर तर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडी अनुभवाला आली. दुपारनंतर टोलनाक्यावर या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती निवळली.
बुधवारी बँका बंद असल्याने सुटे पैसे मिळावे, याकरिता रेल्वे प्रवाशांनी ठाणे स्थानकातील रेल्वे तिकीटघरांसमोर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. परंतु, खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात सुटे पैसे नसल्यामुळे प्रवासी आणि रेल्वे तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत होते. वाद वाढल्याने रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. इस्पितळे व मेडिकल दुकानांत या नोटा चालणार, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. परंतु, बहुतांशखासगी रुग्णालयांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिला.
खासगी दवाखान्यांत पाऊल ठेवताच तेथील रिसेप्शनिस्ट रुग्णांच्या नातलगांना डॉक्टर रद्द झालेल्या नोटा स्वीकारणार नाहीत, असे बजावत होत्या. त्यामुळे रुग्णांची चांगलीच पंचाईत होत होती. या पेचातून मार्ग काढण्याकरिता रुग्णांच्या नातलगांना औषधे आणण्याकरिता मेडिकल दुकानात पिटाळले जात होते. तेथे सुटे पैसे मिळाल्यावर डॉक्टरांची फी दिली जात होती. मेडिकल दुकानांकडील सुटे पैसे संपल्यावर त्यांनी तुमचे १००० रुपये जमा आहेत. उरलेल्या रकमेची औषधे नंतर लागतील, तशी घेऊन जा, असे सांगण्यास सुरुवात केली.
पेट्रोलपंपांवरही अशीच गोंधळाची स्थिती होती. या नोटा तेथे स्वीकारल्या जातील, असे मोदींनी जाहीर केले असल्याने मोटारी, दुचाकी यांच्या रांगा पंपांवर लागल्या होत्या. लीटर-दोन लीटर पेट्रोल टाकायला गेलेल्यांना पंपावरील कर्मचारी हाकलून देत होते.
मोटारीत हजार-पाचशे रुपयांचे पेट्रोल टाकायचे तर टाका नाहीतर निघा, अशी उर्मट भाषा कर्मचारी करीत असल्याने प्रवासी व कर्मचारी यांच्यात हमरीतुमरीची वेळ आली.
खालापूर टोलनाक्यावर तारांबळ...
वावोशी : पाचशे व हजारच्या नोटा बंदीचा निर्णय केंद्र शासनाने पूर्वकल्पना न देता अचानक घेतल्याने बुधवारी सर्वत्र नागरिकांची तारांबळ उडालेली दिसली. यामध्ये मुंबई-पुणे प्रवास करणारेही सुटले नाहीत. मुंबई- पुणे प्रवास करताना खालापूर टोलनाक्यावर पाचशे व हजारची नोट घेत नसल्याने या टोलनाक्यावर काही तास लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांचा खोळंबा झाल्याने टोलनाका प्रशासन व प्रवासी यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता.
तणावानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर सुटे पैसे नसल्यास त्यांना मोफत सोडण्यात आले तर सुटे पैसे देणाऱ्यांकडून पैसे घेण्यात येत असल्यानेही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. कुणालाही मोफत सोडण्यात आले नाही. पैसे सुटे नसणाऱ्या वाहनचालकांना बाजूला घेऊन पैसे सुटे झाल्यानंतर पैसे घेऊन सोडण्यात आले, तसेच आमच्याकडे पैसे सुटे नसल्यास पाचशे, हजार रु पये घेतले जातात मात्र सुट्या पैशांची अडचण आमच्याकडेसुद्धा आहे, असे खालापूर टोलनाक्याचे आयआरबी प्रशासकीय अधिकारी श्रीवास्तव यांनी सांगितले.