मराठवाड्याची मनाची श्रीमंती मोठी : अ‍ॅड. उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:40 AM2019-09-19T11:40:36+5:302019-09-19T11:41:20+5:30

माझा मराठवाडा मागसलेला असून, मराठवाड्यावर निसर्ग कोपला आहे असा न्यूनगंडही कोणी ठेऊ नये...

The wealth of Marathwada's heart is big : Adv. ujjwal nikam | मराठवाड्याची मनाची श्रीमंती मोठी : अ‍ॅड. उज्ज्वल निकम

मराठवाड्याची मनाची श्रीमंती मोठी : अ‍ॅड. उज्ज्वल निकम

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्कारा'ने गौरव

पुणे : मराठवाड्यामध्ये पैशांची श्रीमंती कमी आहे, पण मनाची श्रीमंती मोठी आहे. त्यामुळे मराठवाडा मागासलेला आहे हे विधान मला योग्य वाटत नाही़  पैशाची श्रीमंती केव्हाही गळून पडेल पण मनाची श्रीमंती कायमची असते़ असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.  माझा मराठवाडा मागसलेला असून, मराठवाड्यावर निसर्ग कोपला आहे असा न्यूनगंडही कोणी ठेऊ नये असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले़ 
मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने, मराठवाड्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्कारा'ने गौरविण्यात आले.  त्यावेळी अ‍ॅड. निकम बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर होते़  यावेळी डॉ. भगवान कापसे यांना कृषी पुरस्कार, पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना प्रशासकीय पुरस्कार, भास्कर पेरे पाटील यांना सामाजिक पुरस्कार, भारत सातपुते यांना शैक्षणिक पुरस्कार, राजेश मंडलिक यांना उद्योजक पुरस्काराने तसेच संगमेश्वर बोमणे, लहुराज गंडे, अ‍ॅड. सुदाम खोसे, दमयंती खोसे यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आले.  समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोल पिंगळीकर आणि सचिव दत्ताजी मेहत्रे यावेळी उपस्थित होते.
अ‍ॅड. निकम म्हणाले की,  पाऊस नसलेल्या भागातील तरुण स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुण्यात येतात. पदरी निराशा पडल्यानंतर ते निराश होतात. अशावेळी त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. छत्री कधी पाऊस थांबवू शकत नाही. पण ती पावसात उभे राहण्याचे धाडस निर्माण करते. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली नाही. पण तो जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. हा आत्मविश्वास वाढविण्याचे काम मराठवाडा समन्वय समिती करीत असल्याचे ते म्हणाले़ 
म्हैसेकर यांनी, माझे मराठवाड्याशी अतूट नाते असल्याचे सांगितले़ आज बाहेर गेलो तरी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. काही चांगल्या प्रकल्पांमुळे मराठवाड्याची परिस्थिती सुधारत आहे. धडपड करण्याची प्रवृत्ती माणसाला शिकवत असल्याचेही ते म्हणाले़
यावेळी वैभवशाली मराठवाडा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना परदेशी आणि महेश थोरवे यांनी केले. 
--------------

Web Title: The wealth of Marathwada's heart is big : Adv. ujjwal nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.