‘ती’ शस्त्रे फॉरेन्सिक लॅबकडे?
By admin | Published: December 4, 2014 02:33 AM2014-12-04T02:33:16+5:302014-12-04T02:33:16+5:30
जवखेडे खालसा येथील एका घरात सापडलेली काही शस्त्रे तपासाचा भाग म्हणून अहमदाबाद येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याचे समजते
पाथर्डी (जि.अहमदनगर) : जवखेडे खालसा येथील एका घरात सापडलेली काही शस्त्रे तपासाचा भाग म्हणून अहमदाबाद येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
दलित कुटुंबातील हत्या प्रकरणात पोलिसांना आता महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. मंगळवारी रात्री पोलिसांना जवखेडे येथे एका घरामध्ये शस्त्रे सापडली.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे २० आॅक्टोबरला दलित कुटुंबातील तिघांची धारदार शस्त्राने हत्या झाली. त्याचे राज्यासह देशभरात पडसाद उमटले. घटनेला सुमारे ४३ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी पोलीस मात्र ठोस निष्कर्षापर्यत पोहोचलेले नाहीत. पोलिसांचा तपास अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी रात्री पोलिसांनी जवखेडे येथील एका कुटुंबाच्या घरात जाऊन झडती घेतली. त्यात त्यांना काही शस्त्रे, कपडे आढळले. सापडलेली शस्त्रे याच गुन्ह्यात वापरली का, याचा छडा लावण्यासाठी ही शस्त्रे अहमदाबाद येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याचे बोलले जाते.
याबाबत तपास अधिकारी सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी काही शस्त्रे व कपडे सापडल्याच्या घटनेचा इन्कार केला. ठोस कोणताही पुरावा या प्रकरणात सापडला नसून, तसा पुरावा हाती आल्यावर माध्यमांना सांगितले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)