शिवसेनेचा भगवा घालून NCP च्या लोकांनी कार्यालय फोडलं; तानाजी सावंतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:24 AM2022-08-02T11:24:26+5:302022-08-02T11:25:02+5:30
कात्रजमधील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कात्रज चौकातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता
पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर असून सासवड येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री शिंदे तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाला भेट देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा भगवा घालून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझे ऑफिस फोडलं असा दावा तानाजी सावंत यांनी केला.
तानाजी सावंत म्हणाले की, माझं ऑफिस फोडणं इतके सोप्प नाही. कार्यालय फोडणाऱ्यांनी औकातीत राहावं असं इशारा दिला होता. भविष्यात ज्यांनी कार्यालयावर दगड फेकले त्यांना कळेलच. सत्तेचा माज आम्ही करणार नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी इथे आलो आहे. माझे शिवसैनिक तिथे नव्हते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेचे तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली. शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. शिवसैनिक अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. असे असताना दक्षिण उपनगरातील शिवसैनिकामध्ये असलेला असंतोष उफाळून आला आणि पहिल्यापासून पक्षात नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.
कात्रजमधील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कात्रज चौकातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी वेळीच त्यांना रोखले. यानंतर पोलिसांनी याठिकाणी दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करीत शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती.
औकातीत राहावं, अन्यथा ‘जशास तसे...
तोडफोड करणाऱ्यांनी औकातीत राहावे, अन्यथा ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा इशारा सावंत यांनी सोशल मीडियावरून इशारा दिला होता. त्यांचे बंधू, माजी जिल्हाप्रमुख शिवाजी सावंत यांनी मात्र तोडफोड करणारे जर शिवसैनिक असतील तर आमच्याच लोकांवर कारवाई कशी करणार? असा सवाल उपस्थित केला होता.