अज्ञात वाहनाच्या धडकेने वनपाल ठार
By admin | Published: September 10, 2016 09:02 PM2016-09-10T21:02:14+5:302016-09-10T21:02:14+5:30
म्हसावद येथील अमरधामसमोर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने वनपाल खगेश्वर तुकाराम लामगे यांचा जागीच मृत्यू झाला
Next
>ऑनलाइन लोकमत
म्हसावदजवळील घटना : अज्ञात वाहनाचा शोध घेण्याची मागणी
शहादा, दि. 10 - तालुक्यातील म्हसावद येथील अमरधामसमोर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने वनपाल खगेश्वर तुकाराम लामगे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
म्हसावद येथील रहिवासी व कोटबांधणी येथे वनपाल म्हणून कार्यरत खगेश्वर लामगे (४०) हे शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मोटारसायकलीने गावाकडे येत असताना कन्हेरी नदीवरील पुलालगत अमरधामजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की त्यात लामगे यांचे शरीर छिन्नविछिन्न होऊन मोटारसायकलीचे तुकडे झाले होते. अपघात झाला त्यावेळी पाऊस सुरू होता. घटना पाहणाऱ्या दोन-तीन जणांना मुर्च्छा येऊन बेशुद्ध झाले. ही घटना गावात कळताच त्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ व व्यावसायिकांनी दुकाने बंद करून घटनास्थळी धाव घेतली. शहाद्याचे सहायक उपवनसंरक्षक पी.पी. सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. म्हसावद ग्रामीण रुग्णालयातही गर्दी झाली होती. याप्रकरणी म्हसावद पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अज्ञात वाहन व चालक फरार आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाचा त्वरित शोध घेऊन अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
खगेश्वर लामगे हे म्हसावद येथील रहिवासी होते. सध्या त्यांचे वास्तव्य शहादा येथील महावीरनगरमध्ये होते. सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर आठ वर्षापूर्वी त्यांची वनविभागात निवड झाली होती. गेल्या महिन्यातच त्यांना पदोन्नती मिळून कोटबांधणी येथे वनपाल म्हणून रुजू झाले होते. शिस्तप्रिय, प्रामाणिक व मनमिळावू म्हणून त्यांची ओळख होती, असे सहायक उपवनसंरक्षक पी.पी. सूर्यवंशी यांनी सांगितले. खगेश्वर लामगे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्युने वनविभाग व गावात हळहळ व्यक्त होत आहे.
छाव्याला जीवदान
पाच दिवसांपूर्वी म्हसावद गावाजवळ एका नाल्यालगत बिबट्याचा सुमारे तीन महिने वयाचा छावा जखमी अवस्थेत आढळून आला होता. या छाव्याचा खगेश्वर लामगे यांनी जीव वाचवला होता. तीन दिवसापूर्वी त्यांनी या छाव्याला वन्यजीव संरक्षण विभागाकडे पोहोचवले होते.