परतीच्या पावसासाठी हवामान अनुकूल!
By admin | Published: October 2, 2014 11:59 PM2014-10-02T23:59:33+5:302014-10-02T23:59:57+5:30
विदर्भात प्रतीक्षा : पिकांना पाण्याची गरज
अकोला : परतीच्या पावसासाठी हवामान अनुकूल होत आहे. येत्या आठवड्यात विदर्भात परतीच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने विदर्भाला दगा दिला. पश्चिम विदर्भात तर पावसाने सरासरीही गाठली नाही. परिणामी पिकांना झळ बसली असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकण्याची दाट शक्यता आहे. पिकांना आता पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे मृग नक्षत्राप्रमाणेच परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.
ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी परतीच्या पावसासाठी हवामान अनुकूल होत असल्याचा अंदाज वर्तविला आहे. जेवढे तापमान वाढेल तेवढे ते परतीच्या पावसासाठी पोषक ठरणार आहे. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस पडेल, असे त्यांनी सांगितले. परतीच्या पावसाने मेघालय, आसाममध्ये जोरदार हजेरी लावली. येत्या दोन-चार दिवसांत परतीचा पाऊस येईल, असा अंदाज डॉ. साबळे यांनी वर्तविला आहे.