हापूसच्या हंगामाला हवामानाची लागण

By admin | Published: December 22, 2015 01:09 AM2015-12-22T01:09:42+5:302015-12-22T01:13:42+5:30

थंडी गायबच : मोहोर प्रक्रियाही यंदा उशिराच

Weather incident of Happus season | हापूसच्या हंगामाला हवामानाची लागण

हापूसच्या हंगामाला हवामानाची लागण

Next

रत्नागिरी : डिसेंबर संपत आला तरी हवामानामध्ये फारसा बदल झालेला नाही. थंडी गायब असल्यामुळे मोहोर प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे यावर्षीचा हंगाम लांबणार असल्याची भीती निर्माण होत आहे.
यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा निम्मा झाल्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणात आली. काही ठिकाणी पालवी जून झाली आहे. तरीही काही झाडांना अद्याप पालवीची प्रक्रिया सुरूच राहिली आहे. कडक पालवी झालेल्या झाडांना मोहोर प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, हे प्रमाण अल्प आहे. आतापर्यंत जेमतेम ३० टक्के झाडांना मोहोर आला आहे. ७० टक्के झाडे मोहोराशिवाय आहेत.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी सुरु झाली, तर येणाऱ्या मोहोरामुळे होणारी फळधारणा त्यामुळे आंबा मार्चअखेर बाजारात येतो. परंतु डिसेंबर संपत आला तरी मोहोर नसल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आंब्याचा पहिला मोहोर हा चांगले व मोठे फळ देणारा मानला जातो. परंतु यावर्षी मोहोरच कमी प्रमाणात असल्यामुळे पिकाचे प्रमाण अत्यल्प राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोहोरच व्यवस्थित आला नसल्यामुळे फळधारणा लांबण्याची शक्यता आहे. आलेल्या मोहोराला किरकोळ फळधारणा आहे. कणीपासून बोरांच्या आकाराएवढी फळे लागली आहेत. परंतु ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सातत्याने वातावरणातील बदलामुळे मोहोर व फळांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. कीटकनाशकांचे वाढते दर, मजुरी, इंधन आदी कारणांमुळे आंबापीक घेणे शक्य होत नाही. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जानेवारी जवळ आला तरी व्यवस्थित मोहोर न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अनेक शेतकरी स्वत:च्या कलमांबरोबरच इतर शेतकऱ्यांची कलमे कराराने घेऊन आंबा व्यवसाय करीत असतात. त्यामुळे कराराने कलमे घेतल्यानंतर ठरलेले पैसे द्यावे लागतात. परंतु गेली दोन वर्षे उत्पन्नच अल्प आल्याने संबंधित शेतकरीवर्गाला आर्थिक भुर्दंड बसला आहे. यावर्षी अद्याप थंडीचे प्रमाण नसल्यामुळे पोषक हवामान आंब्याला उपलब्ध झाले नाही. त्यामुळे यावर्षीचा हंगामदेखील शेतकऱ्यांना चिंतेचा ठरणार अशीच चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)

ऋतुमान बदलले : थंडीचा मोसमही लांबला
यावर्षी सर्वच ऋतुमान बदलल्याने त्याचा परिणाम हापूसच्या पिकावर होणार हे सुरुवातीपासूनच दिसून येत होते. नोव्हेंबरपर्यंत अधूनमधून येणारा पाऊस, त्यामुळे लांबलेली थंडी या साऱ्या वातावरणात यंदा हापूस उशिरा येण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Weather incident of Happus season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.