राज्यातील सर्व कारागृहांमध्ये लागणार वेब कॅमेरे
By admin | Published: October 13, 2016 06:46 AM2016-10-13T06:46:16+5:302016-10-13T06:46:16+5:30
राज्यातील विविध कारागृहांत आता वेब कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने जेलमधील बंदी व कच्च्या कैद्यांचे अद्ययावत छायाचित्र
जमीर काझी / मुंबई
राज्यातील विविध कारागृहांत आता वेब कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने जेलमधील बंदी व कच्च्या कैद्यांचे अद्ययावत छायाचित्र घेण्याबरोबरच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृहातून पलायन केलेल्या किंवा पॅरोल, फर्लोच्या रजेवरून फरार झाल्यास त्यांना शोधण्यासाठी या शूटिंग आणि छायाचित्रांची पोलिसांना मदत होणार आहे.
गेल्या काही महिन्यांत आॅर्थर रोड जेलसह राज्यातील विविध कारागृह व सबजेलमध्ये कैद्यांतील हाणामारी व आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. तसेच शिक्षा भोगत असलेले बंदी संचित (पॅरोल) व अभिवचन (फर्लो) मंजूर रजेवर बाहेर पडल्यानंतर पुन्हा जेलमध्ये परत न येता फरार होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी गृह विभागाकडून कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून वेब कॅमेऱ्यांची खरेदीदेखील केली जात असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राज्यात मुंबई, ठाणे, तळोजा, येरवडा, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती व औरंगाबाद या ९ ठिकाणी मध्यवर्ती कारागृहे आहेत. त्याशिवाय १९ जिल्हा कारागृह वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची अनुक्रमे २३ व ३ कारागृहे आहेत. या ठिकाणी सिद्धदोष झालेले बंदी व कच्चे कैदी यांना गुन्ह्यांचे स्वरूप, गुन्हेगारांची पार्श्वभूमी याचा विचार करून ठेवले जाते. काही दिवसांच्या सुटीवर जेलमधून बाहेर गेल्यानंतर ते फरार होतात. त्यानंतर या कैद्यांच्या शोधासाठी नमूद संबंधित पोलीस घटक व ठाण्यांना ही माहिती पाठविली जाते. तेव्हा संबंधित फरारी कैद्याचे अलीकडच्या काळातील छायाचित्र नसल्यामुळे शोध घेण्याला मर्यादा येतात. त्यामुळे वेब कॅमेऱ्याद्वारे जेलमध्ये त्यांचे फोटो काढून
ठेवले जातील. त्यानंतर फरारी कैद्यांच्या शोधासाठी ते संबंधित पोलीस ठाण्यांना पाठविले जाणार आहेत.
विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेले कैदी तसेच न्यायालयीन कैद्यांची माहितीदेखील या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. वेब कॅमेऱ्यांसह स्पीकर, मायक्रोफोन, व्हीजीए केबलचीही खरेदी केली जाणार आहे. यासाठी निविदा प्रकिया सुरू करण्यात आलेली आहे. २० आॅक्टोबरला या निविदा उघडल्या जाणार आहेत.