पोलीस आयुक्तालयाचे लवकरच संकेतस्थळ
By admin | Published: May 21, 2016 12:44 AM2016-05-21T00:44:17+5:302016-05-21T00:44:17+5:30
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारल्यापासून पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरु केला
पुणे : पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारल्यापासून पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नागरिकांच्या तक्रारींना न्याय देण्यासाठी शुक्ला यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांकही सार्वजनिक केला आहे. यापुढे पाऊल टाकीत पोलीस आयुक्तालयाचे अद्ययावत संकेतस्थळ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे संकेतस्थळ लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर शुक्ला यांनी नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेण्याचे तसेच त्यांच्याशी सौजन्याने
वागण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले होते. यासोबतच स्वत:चा मोबाईल क्रमांक सार्वजनिक करुन नागरिकांना मोबाईलवर मेसेज, व्हॉट्सअॅप आणि कॉलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तांना नागरिक फोन करुन माहितीही देऊ लागले आहेत.
सध्या आयुक्तांना दिवसाला साधारणपणे २00पेक्षा अधिक फोन कॉल्स येत आहेत. यासोबतच ६0 ते ७0 मेसेज आणि तेवढ्याच संख्येने नागरिक प्रत्यक्ष भेटत आहेत. संबंधित नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ उपायुक्त, सहायक आयुक्त आणि निरीक्षकांना आदेश दिले जातात.
पोलीस आयुक्तांना येणारे फोन कॉल नियंत्रण कक्षाकडे वळवण्यात आले आहेत. दररोज संध्याकाळी नियंत्रण कक्षातले अधिकारी किती फोन आले आणि त्यावर काय उपाययोजना केल्या याचा अहवाल देतात. यासोबतच स्थानिक पातळीवरच उपायुक्तांना नागरिकांनी भेटण्याची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. उपायुक्तांकडूनही भेटणाऱ्या नागरिकांसह त्यांच्या तक्रारींचा अहवाल आयुक्तांना दिला जातो. पोलीस आयुक्तालयामध्येही दररोज ६0 ते ७0 नागरिकांना पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद भेटतात.
पोलीस चौकी स्तरापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना, नागरिकांच्या सेवेसाठी आपण आहोत याची जाणीव रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्ययावत संकेतस्थळ असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नवीन संकेतस्थळाचे काम सुरू करण्यात आले आहे.
- रश्मी शुक्ला,
पोलीस आयुक्त