मंत्रालयीन विभागाची संकेतस्थळे आता मराठीत

By admin | Published: January 28, 2017 04:05 AM2017-01-28T04:05:43+5:302017-01-28T04:05:43+5:30

इंग्रजी संकेतस्थळे असलेले सर्व मंत्रालयीन विभाग, शासकीय संस्था आणि महामंडळांनी ती तातडीने मराठीमध्ये करावीत, असा आदेश

Websites of departmental departments are now available in Marathi | मंत्रालयीन विभागाची संकेतस्थळे आता मराठीत

मंत्रालयीन विभागाची संकेतस्थळे आता मराठीत

Next

मुंबई : इंग्रजी संकेतस्थळे असलेले सर्व मंत्रालयीन विभाग, शासकीय संस्था आणि महामंडळांनी ती तातडीने मराठीमध्ये करावीत, असा आदेश मराठी भाषा विभागाने शुक्रवारी काढला. सरकारी कामकाजात मराठीचा वापर वाढण्यासाठी शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना, पत्रव्यवहार आणि संकेतस्थळे आदींमध्ये मराठीचा वापर करावा, असे परिपत्रक २९ जानेवारी २०१३ रोजीच काढण्यात आले होते. तरीही अनेक विभागांची संकेतस्थळे ही आजही इंग्रजीतच निघत आहेत. ती तत्काळ मराठीतून करावीत, असे परिपत्रक काढण्यात आले.
जवळपास ३२ मंत्रालयीन विभाग, संस्था आणि महामंडळांची संकेतस्थळे आजही इंग्रजीत आहेत. त्यात सामान्य प्रशासन विभाग, गृह, महसूल व वने, कृषी, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, वित्त, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, कामगार, सार्वजनिक आरोग्य आणि सहकार व वस्त्रोद्योग विभागाचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)

यंदा मराठी दिनास मिळणार अत्याधुनिक साज-

ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस (२७ फेबु्रवारी) मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या मराठी दिनाची संकल्पना ही ‘संगणक व महाजालावरील मराठी’ अशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी संगणक आणि महाजालावरील मराठीचा वापर कसा होतो? किती प्रकारे करता येऊ शकतो? याविषयी माहिती देण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
इंग्रजीप्रमाणेच संगणकावर आता मराठीमध्ये (देवनागरी) टायपिंग करणे सहज शक्य आहे. याविषयीचा प्रसार करणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमे आणि प्रशासनात मराठी भाषेचा वापर या विषयावर चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबरीने युनिकोडप्रणीत मराठी आणि इनस्क्रिप्ट मराठी कळफलक (कीबोर्ड) या विषयांसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. समाज प्रसार माध्यमांतील (सोशल मीडिया), माहिती तंत्रज्ञान आणि मराठी, इंटरनेटवरील मराठी या क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने आणि सादरीकरणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
बोलीभाषेवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी कविता, प्रसिद्ध उतारे, मराठी भाषाविषयक घोषवाक्ये यांचे भित्तीचित्र प्रदर्शन किंवा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मोडी लिपीचे प्रशिक्षण, व्याख्यान अथवा परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Web Title: Websites of departmental departments are now available in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.